Sunday, April 14, 2024

‘मासिक पाळीत देवळात जावंसं वाटतं जा…, विज्ञानाची माती करू नका!’, हेमांगी कवीची लक्षवेधी पोस्ट

देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कलाकारांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. काही जण चिडीचूप असतात, तर मोजकेच कलाकार निर्भीडपणे मत मांडतात. या निर्भीड कलाकारांमध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या नावाचाही समावेश होतो. हेमांगी स्पष्टवक्ती अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तसेच, सोशल मीडियावर महत्त्वाच्या घडामोडींवर ती व्यक्त होते. ती तिच्या पोस्ट आणि कमेंट्समुळे नेहमीच चर्चेत असते. अशात तिची एक सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

हेमांगी कवीची सोशल मीडिया पोस्ट
समाजात असे काही विषय असतात, ज्यावर मनमोकळेपणाने बोलले जात नाहीत. त्यापैकीच एक विषय म्हणजे मासिक पाळी. याविषयी अनेक वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. जसे की, महिलांनी मासिक पाळी असताना देवळात जाऊ नये. तसेच, याचा संबंध विज्ञानाशी जोडण्याचाही प्रयत्न केला जातो. मात्र, यावर अनेकजण आक्षेपही घेताना दिसतात. त्यात अभिनेत्रीचाही समावेश आहे.

अशात अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिची फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने दुसऱ्या एका युजरची पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “खुप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका!”

युजरची पोस्ट काय?
मैत्रेयी बांदेलकर या नावाच्या युजरने मासिक पाळीविषयी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या मैत्रिणीने इंस्टाग्रामवर पाठवलेला मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये, याची वैज्ञानिक कारणे सांगणारा व्हिडिओ पाहिल्याविषयी भाष्य केले. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, “आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला, इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने पाठवलेला… स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची ‘ *वैज्ञानिक कारणं* ‘ सांगणारा… का तर म्हणे आपल्या शरीरात सात का नऊ वायू असतात, पैकी मासिक पाळी वेळी अशुद्ध रक्त (इथेच आधी हाणलं पाहिजे लोकांना!) खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो, देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात मग तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो! I mean, हद होती है यार!”

तिने पुढे लिहिले की, “म्हणजे तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्या BS ला किमान वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! म्हणजे तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्या BS ला किमान वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! बरं याला जवळपास १ मिलियन लाईक्स! आणखी अलार्मिंग गोष्ट अशी की यात आपल्या ओळखीत लाइक कोणी केलंय हे तपासलं तर, रिल पाठवणारी सोबत अजून बऱ्याच जणी होत्या, सगळ्या मुलीच! एक आत्ता विज्ञान शाखेतून बारावी पास झालेली विद्यार्थिनी, एक microbiology मधे मास्टर्स केलेली मैत्रीण, एक बायोटेक च्या फिल्डमध्ये रिसर्च करणारी सिनियर आणि एक तर चक्क डॉक्टर! आता तर बोलणंच खुंटलं ना! अजून किती दिवस आपण आपल्या परंपरागत कुरवाळलेल्या अंधश्रद्धा वैज्ञानिक म्हणून रेटणार आहोत?

बरं माझं असंही म्हणणं नाही की लोकांनी एका अमूक विचारसरणीला फॉलो करावं! तुम्हाला जे फॉलो करावंसं वाटतं ते करा, मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं? जा! नाही जावसं वाटत? नको जाऊ! पण या सगळ्यात विज्ञानाची माती करु नका ना किमान! तुम्हाला परंपरागत आलेलं जोखडच आता प्रिय आणि योग्य वाटतंय तर हरकत नाही, ते वागवा, मिरवा; जसं नव्वद टक्के लोक करतातच! त्यात विज्ञानाचं validation कशाला हवं? समाजाचं आहे की! ‘याच्यामागे कोणतंही लॉजिक नाही पण मी लहानपणी पासून हेच शिकत आले आणि आता इतक्या वर्षांनी मला ही सवय सोडवणार नाही’ हे मान्य करुन पुढे जाताच येतं की! त्याकरता प्रत्येक अतर्क्य गोष्टीशी विज्ञानाचा बादरायण संबंध लावायची काहीही गरज नाही आणि त्यातून काही सिद्धही होत नाही!

कधी कधी खूप छान वाटतं की आपल्याला मुलांना बायोलॉजी शिकवायची संधी मिळतेय, त्यांना human reproduction, menstrual cycle च्या मागचं विज्ञान शिकवता येतंय, किमान या ऐकणाऱ्या चाळीसांपैकी दहा जण तरी पुढे आयुष्यभर या गैरसमजुतींपासून फटकून राहतील याचं दरवर्षी मनोमन एक समाधान असतं… मग कधीतरी हा गैरसमजुतींनी व्यापलेला विशाल समुद्र दूरवर पसरलेला दिसतो! आता फक्त खिन्न वाटतंय… यातून कुणीच वाचणार नाही… विज्ञानही कधीतरी यातच बुडून संपणार आहे! पण मनोमन एक खात्री आहे , स्वतःला दिलेलं वचन आहे, अगदी शेवटापर्यंत, या लोकांनी विज्ञानाला पुन्हा मंत्रतंत्राच्या जाळ्यात लोटून पार नाहीसं करेपर्यंतही म्हणू हवं तर, पण मी मात्र विज्ञानाच्या बाजूनेच राहणार आहे!”

ही पोस्ट अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर करत मासिक पाळी असताना देवळात न जाणे आणि विज्ञानाविषयी भाष्य केले. ही पोस्ट जोरदार चर्चेत आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत.

हेही वाचा-
बापरे…एवढी हिंमत! तमन्नाला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा घेरा, हात पकडताच अभिनेत्रीने…
‘ही मूर्खांची दुनिया, हिंमत असेल तर…’, ट्रोलर्सवर कडाडला ‘तारा सिंग’

हे देखील वाचा