मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय दिग्गज, जेष्ठ, चतुरस्त्र आणि प्रतिभावान अशा जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावरकर यांनी हिंदी आणि मराठीमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळी आणि मोठी ओळख निर्माण केली होती. अभिनयाचे विद्यापीठ असणाऱ्या सावरकरांकडून आजच्या किंबहुना सर्वच कलाकारांनी शिकण्यासारखे बरेच काही होते. साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वावर जयंत सावरकर विश्वास ठेवणारे होते. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे काम आणि त्यांच्या आठवणी चिरंतन आपल्यासोबत असतील.
जयंत सावरकर यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अशातच दादर अभिमान गीताची निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या प्रणिल हातिसकर यांनी देखील सावरकरांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
“काही कलावंत हे हाडाचे कलाकार असतात, त्यांच्या अभिनयात जिवंतपणा असतो, वाक्यरचना, संवाद हे नैसर्गिक कसबीने साकारणं हे मोजक्याच कलाकारांना जमतं त्यातलेच एक म्हणजे जयंत सावरकर सर, दादरच्या project च्या निमित्ताने पुन्हा एकदा काकांबरोबर दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, वयाच्या ८७ व्या वर्षी सुद्धा काम करण्याचा त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असा होता. दिग्दर्शकांचा कलाकार म्हणूनच ते प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे काम करत राहिले, “दादरचा project उत्तम झालाय, तू मोठा दिग्दर्शक होणार” अशी कौतुकाची शाबासकी त्यांनी दिली आणि पुढच्या project ची वाट पाहतोय लवकरच भेटू म्हणाले.
सावरकर काका तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुमचे कृपाशीर्वाद असेच राहो” हे कॅप्शन देत प्राणिल यांनी जयंत सावरकर यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते त्यांच्या दादर बद्दलच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आईशी संवाद साधताना दिसत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये जयंत सावरकर म्हणतात, “आई ऐकतेस ना, अगं दादरला स्वामींच्या मठात दर्शनासाठी गेलो होतो आणि आत्मा अगदी तृप्त झाला. दादरला सगळे आहे तसेच आहे, काहीही बदल झालेला नाही. आपले विसावा हॉटेलच्या समोर असलेले गोल देऊळ, त्या जवळच्या सर्व भरलेल्या गल्ल्या, भाजीबाजार अगदी सगळे सगळे तसेच आहे. त्यात काहीही बदलेले नाही. त्या काळी २५ पैशाला ५ लिंब मिळायची आता २५ रुपयाला… भाव वाढले, पण स्थायी भाव आजही तसाच आहे.
माणसं नेटवर्कमध्ये आले आहेत, पण कोणी कनेक्टेडच नाहीत. तुझ्या माझ्यासारखे कनेक्शन आतून असावे लागते. अधूनमधून आठवण काढून तुला त्रास देत राहिन”. दरम्यान त्यांचा हा संवाद फोनवर होता. जो त्यांनी त्यांच्या स्वर्गीय आईसोबत साधला.
नाटक, मालिका, चित्रपट, ओटीटी अशा सर्वच माध्यमांमध्ये प्रतिभावान अभिनय करणाऱ्या जयंत सावरकर यांच्या निधनामुळे एका पर्वाचा अंत झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तमन्नाला कुणी दिला जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा? आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी
One Friday Night: रवीनाच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलचा भडीमार; तुम्हीही पाहाच