×

…जेव्हा शाळाच बनते झॉम्बीजचा अड्डा! अंगावर शहारे आणेल ‘ही’ थरारक बेवसीरिज

सध्या मनोरंजन क्षेत्रातील प्रेक्षकांना चित्रपटांपेक्षा विविध विषयांवरील वेबसिरीज पाहण्याची मोठी आवड निर्माण झाली आहे. प्रेक्षकांमध्ये सध्या अशा भन्नाट वेब सिरीजबद्दलचे आकर्षण वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांची ही मागणी लक्षात घेत निर्मातेही अनेक नवनवीन वेबसिरीज प्रदर्शित करत आहेत. नुकतीच नेटफ्लिक्सवर आणखी एक नवीन कोरियन वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, सध्या सर्वत्र या वेबसिरीजची चर्चा पाहायला मिळत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या नवनवीन कोरियन वेबसिरीज प्रदर्शित होताना दिसत आहेत. यामध्ये नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘ऑल ऑफ अस आर डेड’ वेबसिरीजची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. प्रेक्षक या वेबसिरीजची तुलना ‘स्किव्ड गेम्स’सोबत करत आहेत. ही नवी वेबसिरीज म्हणजे ‘स्किव्ड गेम्स’चाच भाग असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. ‘ऑल ऑफ अस आर डेड’ आणि ‘स्क्विड गेम्स’ या दोन्ही वेबसिरीजची कथा जवळजवळ सारखीच आहे. दोन्ही वेबसिरीजमध्ये मृत्युचं तांडव पाहायला मिळत आहे. सोबतच दोन्हींमध्ये जवळच्याच व्यक्तीकडून धोका असल्याने प्रेक्षकांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, ‘ऑल ऑफ अस आर डेड’ ही एका झॉम्बी हल्ल्याची कथा आहे. या हल्ल्यात शाळेतील सर्व विद्यार्थी एका मोठ्या संकटात सापडतात, ज्यामुळे त्यांना स्वतःचा जीव वाचवत वाचवत शाळेवर आलेलं हे संकटही दूर करायचे असते. या भयानक कथेमुळे ही संपुर्ण वेबसिरीज अंगावर शहारे आणणारी ठरते.

या वेबसिरीजची कथा शाळेच्या प्रयोगशाळेतून होते. जिथे एक विज्ञानाचा प्रयोग सुरू असतो. हा प्रयोग करताना विद्यार्थांकडून मोठी चूक होते, ज्यामुळे एक मुलगी झॉम्बीजची शिकार होते. इथूनच या सिरीजच्या थरारक कथेला सुरुवात होते.

या भन्नाट आणि थरारक बेबसिरीजमध्ये ‘स्क्विड गेम्स’मधील कलाकार ली यू प्रमुख भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर यू चान यंग, पार्क जी हू, चो यी ह्यून, पार्क सोलोमन आणि यू इन सू हे कोरियन कलाकार यामध्ये भूमिका साकारत आहेत. ही नवी वेबसिरीजसुद्धा तुफान लोकप्रिय ठरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

हेही वाचा :

Latest Post