कलाकार आणि त्यांचे वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही. अनेक कलाकार तर त्यांच्या कामापेक्षा अधिक त्यांच्या वादांमुळेच प्रकाशझोतात येतात. बॉलिवूडमधील सर्वत फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी देखील अनेक वादांमध्ये अडकली आहे. मात्र तिचा आतापर्यंतचा सर्वात गाजलेला वाद म्हणजे रिचर्ड गेरेने सार्वजनिक ठिकाणी शिल्पाला केलेले किस. २००७ साली झालेल्या या घटनेने संपूर्ण देशात एकच गोंधळ उडाला होता. ही घटना झाल्यानंतर शिल्पावर अश्लीलता पसरवण्याचा आरोप केला गेला. आज १४ वर्षांनी तिला या आरोपामध्ये दिलासा मिळाला आहे.
हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याने २००७ साली एड्स आजाराच्या जागरूकतेची कार्यक्रमादरम्यान शिल्पाला भर समारंभात किस केले होते. त्यानंतर मोठा वादंग उठत शिल्पावर अनेक आरोप केले गेले आणि तिच्यावर तक्रार दाखल झाली होती. मात्र आता तब्ब्ल १४ वर्षांनी कोर्टाने शिल्पाला या आरोपातून मुक्त केले आहे. एका मोठ्या वेबसाईटच्या बातमीनुसार मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट केतकी चव्हाणने शिल्पाला या आरोपातून मुक्त केले असून, त्यांनी सांगितले या प्रकरणात शिल्पा आरोपी नसून ती रिचर्ड गेरेला बळी पडली होती. मजिस्ट्रेट यांच्या सांगण्यानुसार शिल्पा शेट्टी विरोधात असलेले सर्व आरोप निराधार असल्याने तिला या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे.
मजिस्ट्रेट त्यांच्या सांगण्यानुसार शिल्पा शेट्टी या प्रकरणात कोणत्याही पद्धतीने अपराधी असल्याचे दिसत नाही. तत्पूर्वी रिचर्ड गेरेने २००७ साली जेव्हा शिल्पाला किस केले तेव्हा त्याच्या विरोधात राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथे तक्रार दाखल केली गेली होती. या घटनेनंतर राजस्थानमधील मुंडावर येथे न्यायिक मजिस्ट्रेट प्रथम श्रेणीच्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यात शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती, आणि जिला परवानगी देखील मिळाली होती.
यानंतर शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे यांच्याविरोधात आईपीसीचे कलम २९२, २९३, २९४ (अश्लीलता)
अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली होती. तर शिल्पाने सुप्रीम कोर्टात याचिका टाकत ही केस मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. जिला २०१७ साली मान्य करण्यात आले. त्यानंतर याची सुनावणी मुंबईमध्ये सुरु होती.
शिल्पाचे वकील असणाऱ्या मधुकर दळवी यांनी कलम २३९ (पोलीस रिपोर्ट आणि कागदपत्रांवर विचार केल्यानंतर मुक्तता) २४५ (पुराव्यांवर विचार केल्यानंतर मुक्तता) अंतर्गत तिला आरोपमुक्त केले आहे. शिल्पाने तिच्या याचिकेमध्ये म्हटले होते की, तिची एकच चूक झाली आणि ती म्हणजे तिने रिचर्ड गेरेला किस करण्यापासून रोखले नाही. अखेर आता शिल्पा या आरोपातून मुक्त झाली आहे.
हेही वाचा :