हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेले महान गायक मुकेश; त्यांच्यासाठी राज कपूरांनी म्हटले होते, ‘जर मी शरीर आहे, तर मुकेश…’


हिंदी चित्रपट हे सिनेमातील गाण्यांशिवाय अपूर्णच असतात. असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांच्यात गाण्यांची आवश्यकता नसते. मात्र, आपल्या देशात गाण्यांबद्दल असणारी क्रेझ लक्षात घेऊन निर्माता, दिग्दर्शक चित्रपटाच्या सुरुवातीला किंवा शेवटी एक गाणे सिनेमात टाकतातच. गाण्यांचे एवढे वेड प्रेक्षकांमध्ये आहे. जिथे गाण्यांचा विषय चालू आहे, तिथे गायकांचा विषय येणार नाही, असे होणारंच नाही. गाणे म्हटले की, गायक आपोआपच येतात. आज आपण पाहिले, तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज आणि सुरेल गायक होऊन गेले. अशा गायकांनी गाण्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन बसवले. असे मोठे गायक आणि त्यांची गाणी आजच्या गायकांसाठी कोणत्या अभ्यासापेक्षा कमी नाही. आज आपण आपल्या इंडस्ट्रीमधील अशाच एका महान गायकाबद्दल जाणून घेणार आहोत. या गायकाचे नाव आहे मुकेश. मुकेश यांनी त्यांच्या आवाजाने अनेक दशकं चित्रपटसृष्टीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. गुरुवारी (२२ जुलै) या महान गायकाची ९८ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश.

मुकेश यांचा जन्म २२ जुलै, १९२३ साली दिल्लीमध्ये झाला. त्यांचे संपूर्ण बालपण दिल्लीमध्येच गेले. मुकेश हे त्यांच्या आई- वडिलांचे चंद माथुर आणि चांद रानी यांचे सहावे पुत्र होते. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीमध्ये घेतले आणि पुढे त्यांना सार्वजनिक क्षेत्रात नोकरी मिळाली. मुकेश यांना लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड होती. ते नेहमी गाणे गुणगुणताना दिसायचे. एका विवाह समारंभात मुकेश त्यांचे गाणे सादर करत होते, तेव्हा अभिनेते मोतीलाल यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी मुकेश यांच्यातील प्रतिभा ओळखली.

पुढे मोतीलाल त्यांना मुंबईला घेऊन आले आणि त्यांना पार्श्वगायनासाठी संधी दिली. १९४१ साली मुकेश यांनी ‘निर्दोष’ चित्रपटासाठी पहिल्यांदा ‘दिल जलता है तो जलने दो’ हे गीत गात या सिनेमात अभिनय देखील केला. मात्र, या सिनेमामुळे त्यांच्या गाण्याचा करिअरला मोठी उसळी मिळाली, आणि अभिनयात नाही, तर गाण्यात त्यांना अनेक ऑफर यायला सुरुवात झाली.

मुकेश यांनी त्यांच्या गाण्याच्या करिअरमध्ये राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, महानायक अमिताभ बच्चन, मनोज कुमार, फिरोज गांधी, सुनील दत्त आदी अनेक सुपरस्टार कलाकारांसाठी आवाज दिला. विशेष म्हणजे राज कपूर हे मुकेश यांना आपला आवाज म्हणायचे. त्यांनी म्हटले होते की, “जर मी शरीर आहे, तर मुकेश माझा आत्मा.”

मुकेश यांनी हिंदीसोबतच उर्दू, मराठी आणि पंजाबी भाषांमध्ये देखील अनेक हिट गाणी गायली. त्यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये ‘क्या खूब लगती हो’, ‘धीरे धीरे बोल कोई सुन न ले’, ‘जाने कहां गए वो दिन’, ‘जीना यहां, मरना यहां’, ‘चल री सजनी अब क्या सोचे’, ‘आंसू भरी हैं ये जीवन की राहें’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘इक दिन बिक जाएगा माटी के मोल’, ‘ईचक दाना, बीचक दाना, दाने ऊपर दाना’, ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ आदी सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे. मुकेश हे बहुतकरून उदास गाण्यांसाठी जास्त ओळखले जातात.

मुकेश यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी सरल त्रिवेदी यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला घरातून मान्यता नसूनही या दोघांनी अभिनेते मोतीलाल यांच्या मदतीने एका मंदिरात लग्न केले. मुकेश यांनी त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे या जगातून जाणे एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते. एकदा ते अमेरिकेत एका कॉन्सर्टसाठी गेले असताना, त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अवघ्या ५३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत लता मंगेशकर होत्या. त्याच त्यांचे पार्थिव शरीर घेऊन भारतात आल्या होत्या. आजही मुकेश त्यांच्या गाण्यांतून लोकांचे पुरेपर मनोरंजन करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलनवाज शेख’ कशी बनली संजय दत्तची पत्नी मान्यता? लग्नाआधी करायची ‘सी ग्रेड’ सिनेमात काम

-‘प्रिन्स ऑफ रोमान्स’ अरमान मलिकचे २७ व्या वर्षात पदार्पण; ऐका त्याची आतापर्यंतची टॉप ५ गाणी

-जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.