Thursday, April 18, 2024

क्रिकेट खेळताना झाली होती लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांची भेट; मैत्री इतकी खास की, एकाचवेळी पडलेले प्रेमात

‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा’, हे गाणं ज्या एका जोडीने अजरामर केलं आणि या गाण्याप्रमाणेच त्यांची मैत्रीही शेवटपर्यंत सलामतच राहिली, ती जोडी म्हणजेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल. भारतीय संगीत इतिहासातील एक अजरामर जोडी. उत्कृष्ट वादक आणि संगीतकार म्हणून ज्यांच नाव भारतीय इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिलं गेलं तेच लक्ष्मीकांत- प्यारेलाल. कदाचित त्यांचं नाव नव्या पिढीसाठी नवीन असेलही, पण त्यांची गाणी जवळपास प्रत्येकाने एकदातरी ऐकली असतीलच, कदाचित काहींना ही एकच व्यक्ती वाटलीही असेल. मात्र, या दोन वेगवेगळ्या व्यक्ती पण एकमेकांमध्ये समरसून गेलेल्या. लक्ष्मीकांतशिवाय प्यारेलालला पूर्णत्व नाही, तसं प्यारेलालला लक्ष्मीकांतशिवाय. म्हणूनच आज याच जोडीच्या जीवन का गीत म्हणजेच ज्यांची जीवनकथा जाणून घेऊयात…

दिनांक ३ नोव्हेंबर १९३७, दिवस लक्ष्मीपूजनाचा. याच दिवशी कुडाळकर कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. कदाचित लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर जन्मल्याने त्याचं नाव ठेवण्यात आलं लक्ष्मीकांत, पण त्यावेळी कोणाच्याही ध्यानीमनी नसेल की, खरंच या मुलावर लक्ष्मीचा वरदहस्त असेल. लक्ष्मीकांत विले-पार्लेत लहानाचा मोठा होत होता. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यातच तो लहान असताना वडील गेले. त्यामुळे लहानपणी स्वत:ला आणि कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी त्याच्यावर आणि त्याच्या भावावर आली. असं सांगितलं जातं की, छोट्या लक्ष्मीकांत आणि त्याचा मोठा भाऊ शशिकांत यांना त्यांच्या बाबांच्या मित्राने संगीतात काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मग लक्ष्मीकांत मंडोलिन वाजवायला शिकला आणि शशीकांत तबला.

इकडे लक्ष्मीकांत विले- पार्लेत आपलं बालपण घालवत असताना ३ सप्टेंबर, १९४० मध्ये प्यारेलाल यांचा जन्म झाला. ते लहान असतानाच आईचे निधन झाले, त्यामुळे वडिलांवर जबाबदारी होती. वडील पंडित रामप्रसाद शर्मा तुतारी वादक होते. त्यामुळे प्यारेलाल आणि त्यांच्या भावांना संगीताचा वारसा तसा घरातूनत मिळाला होता. प्यारेलाल यांनी वयाच्या ७-८ व्या वर्षापासूनच व्हायोलिन वाजवायला शिकण्यास प्रारंभ केलेला. पुढे ते गोव्यातील प्रसिद्ध व्हायोलिन वादक अँथनी गोंसालविस यांच्याकडून व्हायोलिन वाजवण्यासही शिकले, पण ते १२ वर्षांचे होईपर्यंत घरातील परिस्थिती बिकट झाली होती.

त्यामुळे प्यारेलाल यांनी रणजीत स्टुडियोमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी व्हायोलिन वादक म्हणून काम केलं, ज्यूनियर चाइल्ड आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. केवळ वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी व्हायोलिन वादक म्हणून जोगन या बुलो सी राणी यांच्या चित्रपटासाठी पदार्पण केले.

दुसरीकडे लक्ष्मीकांत यांनीही प्रसिद्ध मंडोलिन वादक हुसेन अली यांच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी बाळ मुकुंद इंदोरकरांकडूनही मंडोलिन वादनाचं शिक्षण घेतलं. त्यांनी हुसनलाल भागत्रम यांच्याकडून व्हायोलिनही शिकले. इतकंच नाही, तर करियर घडवताना संघर्ष करत असताना त्यांनी आँखे, भक्त पुंडलिक आशा चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही कामं केली.

लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल हे दोघेही आपापल्या परीने कुटुंबाचा भार हलका करत होते, पण म्हणतात ना वेळ यावी लागते, तसं झालं आणि हे दोघे एकमेकांना भेटले ते क्रिकेट खेळताना. भारतात क्रिकेट हा खेळ काय काय करू शकतो ना. झालं असं की, अहमद वाड्यात प्यारेलाल यांचं कुटुंब राहात असायचं तिचे फेमस स्टुडिओज होतं. लक्ष्मीकांत त्या स्टुडिओत यायचे. त्यावेळी मोकळ्या वेळेत प्यारेलाल त्यांच्या भावडांबरोबर क्रिकेट खेळत असताना लक्ष्मीकांतही सामील व्हायचे. त्यातूनच त्यांची मैत्री जमली.

इतकंच नाही त्यांची मैत्री बहरली ती मंगेशकरांच्या घरात. मंगेशकर कुटुंबाकडून सुरेल कला केंद्र चालवलं जात होतं, तिथे हे दोघे यायचे. त्यापूर्वी जेव्हा लक्ष्मीकांत १० वर्षांचे होते, तेव्हा कोलाबा येथे लता मंगेशकरांनी त्यांच्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांना मंडोलिन वाजवताना पाहिलं होतं आणि त्या प्रभावित झाल्या होत्या. त्यानंतर लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल या दोन मुलांना त्यांनी सुरेल कला केंद्रातही पाहिलं, त्यांची घरची परिस्थितीची जाणीव झाल्यावर त्यांनी त्यांची नावं सचिन देव बर्मन, सी रामचंद्र, नौशाद, शंकर जयकिशन यांना सुचवली. पुढे हे दोघंही एकमेकांना कामं मिळवून देऊ लागली. मैत्री बहरत होती, ते त्यांच्या ट्यून्स तयार करू लागले आणि इथेच बीज रोवलं गेलं ते इतिहासातील एका सुवर्णपानाचं ज्याचं नाव होतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल.

मंगेशकरांच्या घरातीलच एक किस्सा असा की, जेव्हा प्यारेलाल यांनी व्हायोलिन वादन केलं होतं, तेव्हा लता मंगेशकर इतक्या खूश झाल्या होत्या की, त्यांनी भेट म्हणून त्यांना ५०० रुपये दिले होते. ही त्याकाळातील मोठी रक्कम होती.

लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी देवता या चित्रपटासाठी सर्वात पहिल्यांदा एकत्र वादन केलं. त्यावेळी त्यांना मोठ्या रकमेचे मानधनही मिळाले होते. त्यावेळी प्यारेलाल यांनी त्यांच्या वडिलांसाठी सोन्याचा दागिनाही केला होता. त्यांच्यातील मैत्री घट्ट होत असताना सर्वसामान्यांप्रमाणे तेही खिशाला परवडेल असं कधीतरी बटाटा वडा, कधी मिसळपाव असं खावून मजाही करायचे. कितीही संघर्ष केला, तरी कमाई तेवढी होत नव्हती, हेही तितकंच खरं होतं आणि म्हणूनच प्यारेलाल यांनी युरोपला जाऊन ऑर्केस्ट्रात काम करण्याचंही ठरवलं, पण त्यावेळी लक्ष्मीकांत यांनी त्यांना धीर दिला आणि रोखलं. संतुर वादक पंडित शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक हरिप्रसार चौरासिया यांनीही समजावलं. अखेर प्यारेलाल थांबले.

लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांना संगीतकार व्हायचं होतं. शंकर- जयकिशन त्यांचे आदर्श होते, पण त्यांना संधी मिळत नव्हती. त्यांनी कल्याणजी-आनंदजी यांच्याबरोबरही काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी म्यूजिक अरेंज केले, त्यांचे सहाय्यक बनले. याच काळाचा त्यांना फायदा झाला. जवळपास १० वर्षांचा अनुभव दोघांकडेही जमा झाला होता, त्यांनी काम करताना संगीत क्षेत्राबद्दल जवळपास सर्व बारकावे जाणून घेतले होते, मोठमोठ्या गायक-संगीतकारांबरोबर कामं केली होती. त्यांची ताकद होती की त्यांना बरीच वाद्य वाजवता येत होती. त्यातच त्यांचा एसडी बर्मन, लता मंगेशकर, मोहम्मद रफी अशा दिग्गजाबरोबरचा रॅपोही चांगला होता.

अखेर त्यांनी संगीतकार जोडी म्हणून संगीतक्षेत्रात येण्याचं धाडस केलं, पण दुर्दैवाने त्यांनी संगीत दिलेले दोन्ही चित्रपट रिलीज झालेच नाहीत, पण त्यानंतर बाबूभाई मिस्त्री यांचा पारसमणी हा चित्रपट १९६३ साली आला आणि चित्रपटातील गाण्यांनी लोकप्रियता मिळवली. या चित्रपटाने लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीला पहिलं यश मिळवून दिलं. हा या जोडीचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट ठरला. हसता हुआ नुरानी चेहरा, उई मा उई मा ही गाणी तर विशेष गाजली. त्यावेळी संगीतकार म्हणजे पस्तीशी पार केलेलेच असतात असं अनेकांना वाटायचं, पण लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी हा समज खोडून काढला. कारण पारसमणी जेव्हा रिलीज झाला, तेव्हा प्यारेलाल होते २३ वर्षांचे आणि लक्ष्मीकांत होते २६ वर्षांचे. दोन युवा संगीतकारांनी इतिहास घडवण्यास सुरुवात केली होती, त्यांना त्यावेळी साथ मिळाली लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्याकडून. कमी बजेट असतानाही त्यांनी पारसमणी चित्रपटासाठी गाणी गायली होती.

पारसमणी चित्रपटानंतर मात्र या दोघांनी मागे न वळण्याचा निर्णय घेतला. ते आता लक्ष्मीकांत कुडाळकर आणि प्यारेलाल शर्मा राहिले नव्हते, तर आता लक्ष्मीकांत-प्यारेलाल म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांनी ६०च्या दशकात त्यांचेच आदर्श असणारे शंकर-जयकिशन, ओपी नय्यर, मदन-मोहन, रोशन, रवी, हेमंत कुमार, कल्याणजी-आनंदजी अशा अनेक संगीतकारांना टक्कर देण्यास सुरुवात केली. यासाठी दोस्ती हा चित्रपटही महत्त्वाचा ठरला. खऱ्या अर्थाने ‘दोस्ती’ या चित्रपटाने या दोन जिगरी दोस्तांना स्टार बनवलं होतं.

झाले असे की लक्ष्मीकांत-प्यारेलाल हे संगीतकार झाल्याचे समजून त्यांना वादक म्हणून कामं मिळणं बंद झालं होतं. त्यामुळे त्यांना एका हिट चित्रपटाची गरज होतीच. त्यात रोशन यांनी दोस्ती चित्रपटासाठी संगीत देण्यास नकार दिला आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना संधी मिळाली. मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या गाण्यांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीने संगीत दिलं आणि दोस्ती चित्रपट हिट झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड गाजली. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, त्यांनी शंकर-जयकिशन, मदन-मोहन अशा मुरलेल्या संगीतकारांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला होता. याच चित्रपटातील गाणी ज्यांनी लिहिली त्या सुलतानपुरी यांच्याबरोबर त्यांनी ४५ अन्य चित्रपटांमध्येही काम केली.

साठच्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुल देव बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या येण्याने जयदेव, शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, नौशाद, सी. रामचंद्र, मदन मोहन, ओ.पी. नय्यर, रोशन यांचे पर्व मात्र संपुष्टात आले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची राहुल देव बर्मन यांच्याबरोबरही खूप चांगली मैत्री राहिली, एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्या मैत्रीवर याचा परिणाम झाला नाही. आरडी बर्मन हे चांगले माऊथ ऑर्गनही वाजवायचे त्यांनी दोस्ती चित्रपटात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या दोन गाण्यांसाठी माऊथ ऑर्गन वादनही केलेले.

त्यांची मैत्री केवळ आरडी बर्मन यांच्याशीच नाही, तर लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार या सर्वांशीच चांगली राहिली. त्याचमुळे यांच्याबरोबर त्यांनी सर्वाधिक कामंही केली. विशेष गोष्ट अशी की १९७७ साली आलेल्या ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, लता मंगेशकर यांनी एकत्र गाणं गायलं होतं. त्यामुळे लक्ष्मीकांत- प्यारेलाल ही पहिली आणि एकमेव संगितकार जोडी आहे, ज्यांनी या चार दिग्गजांना एकत्र गायला लावलं. त्यांनी हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे हे गाणं गायलेले. बरं अमर अकबर अँथनीचाच एक किस्सा म्हणजे माय नेम इज अँथनी गोंसालविस हे गाणं प्यारेलाल यांचे व्हायोलिन वादनाचे गुरु अँथनी गोंसालविस यांना दिलेला ट्रिब्यूट होता. याच चित्रपटासाठी देखील लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावे केला. एकवेळतर अशी आली की, प्रत्येक फिल्मफेअर पुरस्कारासाठी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना २-३ चित्रपटांसाठी नामांकनं मिळायची. त्यातच १९७८ ते १९८१ अशा सलग ४ वर्षांसाठी त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावे केले, त्यापूर्वी जिने की राह आणि मिलन या चित्रपटांसाठीही त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता.

याचदरम्यान त्यांना मोठा धक्का बसला तो मोहम्मद रफी यांच्या जाण्याने. आसपास या चित्रपटासाठी शाम फिर क्यों उदास है दोस्त, तू कहीं आसपास है दोस्त हे गाणं १९८० मध्ये रफी यांनी गायलं आणि त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले होते. त्यावेळी हे गाणं त्यांचं अखेरचं ठरलं.

लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांची आणखी एका व्यक्तीही चांगली पार्टनरशिप राहिली, ती म्हणजे आनंद बक्षी यांच्याशी. १९६४ साली मिस्टर एक्स इन बॉम्बे या चित्रपटापासून हा प्रवास सुरू झाला होता. आनंद बक्षी यांनी गाणी लिहिली आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्यांना संगीतबद्ध केलं. या गीतकार संगितकार जोडीने ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. अनेकदा तर रेडिओवर सलग या जोडीची गाणी लागायची, त्यावेळी गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत- प्यारेलाल हे शब्द सहज कानावर पडायचे. विशेष गोष्ट अशी की, आनंद बक्षी यांनी त्या सर्व चित्रपटांसाठी गाणी लिहिली, ज्यासाठी लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांना मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. यासाठी केवळ त्यांचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार अपवाद ठरला.

लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांचा फर्ज हा चित्रपट पहिला गोल्डन जुबली म्युझिकल हिट ठरलेला चित्रपट ठरला. यानंतर मात्र अनेक चित्रपटांनी गोल्डन जुबली सेलिब्रेट केली. लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी केवळ हिंदी चित्रपटांसाठीच काम केली असं नाही, तर साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटांसाठीही कामं केली, त्यांचा मजनू हा तेलुगू चित्रपट गाण्यांसाठी हिट ठरला. बिनाका गीत माला या रेडिओ कार्यक्रमात तर लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्या गाण्यांनी वर्चस्व अनेक वर्ष राखलं होतं.

लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी फक्त एकाच प्रोड्यूसर, फिल्ममेकरबरोबर काम केलं होतं असं नाही, तर त्यांनी राजकपूर, शक्ती संमंता, देव आनंद, मनमोहन देसाई, यश चोप्रा, बोनी कपूर, जे. ओम प्रकाश, राज खोसला, एल व्ही प्रसाद, सुभाष घई, के विश्वनाथ आणि मनोज कुमार अशा अनेकांबरोबर काम केलं होतं. इतकंच नाही, तर गायकांमध्येही त्यांनी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार यांच्याबरोबर काम केलं, तसंच त्यांनी त्याकाळचे नवे गायक सुरेश वाडकर, अल्का याग्निक, उदित नारायण, शैलेंद्र सिंग, एसपी बालसुब्रमण्यम, अनुराधा पौडवाल, विनोद राठोड, अमित कुमार, मन्ना डे अशा अनेकांबरोबरही कामं केली.

इतकंच नाही तर ६०च्या दशकात त्यांना आव्हानं होती शंकर-जयकिशन, ओपी नय्यर, मदन मोहन, रोशन, रवी, हेमंत कुमार, कल्याणजी-आनंदजी यांची, तर सत्तरच्या शतकात त्यांचे प्रतिस्पर्धी होते आर डी बर्मन, कल्याणजी-आनंदजी, रवींद्र जैन, राजेश रोशन, खय्याम. ८०च्या दशकातही बप्पी लाहिरी, राजेश रोशन, खय्याम, आनंद-मिलिंद यांनी त्यांना कांटे की टक्कर दिली, तर अखेरच्या दशकात म्हणजे ९०च्या दशकात अनु मलिक, एआर रेहमान, नदीम-श्रवण, आनंद-मिलिंग हे प्रतिस्पर्धी होते. असं असतानाही लक्ष्मीकांत प्यारेलाल अव्वल क्रमांकाची पसंत राहिले.

त्यांच्या यशाचं गमक म्हणजे प्रत्येकवेळी त्यांनी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाची पद्धत समजून त्यांनी गाणी संगीतबद्ध केली. त्यांच्या गाण्यांमध्ये कधीही तोच-तोचपणा आला नाही आणि हिच त्यांची ताकद राहिली. त्यांच्या आणखी एक ताकद राहिली ती म्हणजे त्यांच्या वाद्यांची निवड. ते ढोलक, तबला, संतुर, गिटार, सेस्कोफोन, वायोलिन, बासरी, हार्मोनिका, माऊथ ऑर्गन,मंडोलिन अशा अनेक वाद्यांमधून ते गाण्यांमध्ये जान फूंकत. महत्त्वाचं म्हणजे, त्यांना वाद्यांमधील असलेली जाणंच त्यांच्यासाठी वरदान ठरली होती. त्याचमुळे ते गाण्यांमध्येही विविधता देऊ शकले. बरं त्यांनी केवळ फोक म्यूजिक दिलं का , तर नाही, कधी क्लासिकल, कधी फोक, कधी डिस्को, कधी कव्वाली, कधी गजल, कधी वेस्टर्न, कधी भजन अशी अशा वेगवेगळ्या प्रकारातील गाणी त्यांनी संगीतबद्द केली. याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर सावन का महिना पवन करे सोर हे गाणं जेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलं, तेव्हा सोर आणि शोर या दोन शब्दांमधला चित्रपटाच्या कथेनुसार फरकही त्यांनी लक्षात घेतला होता. इतके बारकावे त्यांनी प्रत्येक गाणं तयार करताना पाहिले होतं. ही जोडी इतकी अतुट होती की जळपास ५०० पेक्षाही अधिक चित्रपटांत कामं करताना ३००० हजारांच्या आसपास गाणी संगिrतबद्ध केल्यानंतरही लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल पैकी कोणतं गाणं कोणी संगीतबद्ध केलं हे कधीही त्यांनी सहज बाहेर येऊ दिलं नाही. त्यांचं यश एकत्र असण्यातच अधिक असायचं. विशेष गोष्ट अशी की, ते गाणं संगीतबद्ध करताना त्यांच्या डायरीत ते लिहूनही काढत. एक किस्सा असा की, ‘एक प्यार का नगमा है’ हे सुपरहिट गाणं लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या मुलाला, ऋषीकेशला मनोहरी सिंग यांनी भेट दिलेल्या एका छोट्या हार्मोनियमवर संगीतबद्ध केलं होतं.

या दोघांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर, लक्ष्मीकांत यांनी अभिनेत्री बिंदू यांची बहीण जया हिच्याशी लग्न केले होते, तर प्यारेलाल यांनी सुनीला हिच्याशी लग्न केले. दोघांच्या मुलांनी, नातवंडांनीही संगीत क्षेत्रात कामं केली. प्यारेलाल यांचा भाऊ गोरख आणि लक्ष्मीकांत यांचा भाऊ शशीकांत यांचीही चांगली जोडी जमली होती. या दोघांनीही लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्यासाठी कामं केली. प्यारेलाल यांचे सर्व भाऊ संगीत क्षेत्रात कार्यरत होते.

त्यांच्या मैत्रीचा एक उसूल होता, तो म्हणजे कोणीही कितीही खडा टाकण्याचा प्रयत्न केला, तरी एकमेकांशी चर्चा केल्याशिवाय कधीही कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचायचं नाही. तरी १९९०च्या आसपास त्यांच्यात दरार आल्याचा एक प्रसंग घडलाच होता. तरीही त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की, गैरसमद दूर झाले आणि आठवड्यातच ते परत एकत्र आले. त्यांना एकत्र आणण्यात मनोज कुमार, जे ओम प्रकाश, बोनी कपूर, लता मंगेशकर, नौशाद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

यानंतर मात्र ते कधीही वेगळे झाले नाही, १९९०च्या आसपास झालं ते अखेरचं. नव्वदच्या दशतकात नव्या पिढीसमोरही ही जोडी गाजत होती, पण २५ मे, १९९८ मध्ये वयाच्या ६०व्या वर्षी लक्ष्मीकांत यांनी अखेरचा श्वास घेतला आणि ही जोडी त्यांच्या जाण्याने तुटली. प्यारेलाल एकटे पडले, त्यांनी लक्ष्मीकांत यांच्या जाण्याच्या दु:खात काही वर्षे संगीत देणंही सोडलं, पण नंतर जेव्हा त्यांनी एकट्याने काम करण्यास सुरुवात केली, त्यानंतरही त्यांनी लक्ष्मीकांत- प्यारेलाल हेच नाव संगीतकार म्हणून कायम ठेवलं. त्यांनी २००७मध्ये ‘ओम शांती ओम’ या फराह खानच्या चित्रपटासाठी म्यूझिक असिस्टंट म्हणून काम पाहिलं.

लक्ष्मीकांत यांच्या जाण्यानंतरचाच एक किस्सा वाचनात आलेला तो म्हणजे आनंद बक्षी यांच्या मुलाने, राकेशने सांगितला होता. १९९९ मध्ये ‘ताल’ रिलीज झाल्यानंतर सुभाष घई यांनी राकेश यांना सांगितले होते की, “आनंद बक्षींना सांग की, त्यांना एक म्युझिकल करायचे आहे आणि त्यासाठी गाणी लिहायला तयार राहा.” त्यावेळी आनंद बक्षी यांनी उत्तर दिलेले, “त्यांना विचार लक्ष्मीकांत- प्यारेलाल कोठून आणणार?”

आत्ताच्या पिढीने विचारलं की, अशी कोणती गाणी त्यांनी दिली, तर त्यासाठी सावन का महिना, दिल विल प्यार व्यार, एक बंजारा गाये, हवा हवाई, ड्रीम गर्ल, माय नेम इज लखन, इलू इलू, अमर अकबर अँथनी अशी गाणी सांगून पाहा, कदाचित गुगलवर एकदा तरी त्यांचं नाव ते सर्च करतीलच. कारण प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक कार्यक्रमात लागू होतील इतकी गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिलीत हे मात्र नक्की.

लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्यांतील दोस्ती इतकी गहरी होती की, ते जवळपास एकाचवेळी दोन वेगवेगळ्या मुलींच्या प्रेमात पडले, त्यांच्या दोघांच्या लग्नातही साधारण फक्त ६ दिवसांचा फरक होता. त्यांची मुलंही समवयीन आहेत. दोघांच्याही भावांनी या दोघांसाठी वादनही केली. इतकंच काय त्यांनी एकदा सांगितलेलं की, त्यांनी कारही एकाचवेळी घेतलेली, ते इन्कम टॅक्सही एकाच वेळी भरायचे आणि दोघांचे डिटेल्सही जवळपास सारखेच असायचे.

अशीच दोस्तीची मिसाल कायम ठेवलेल्या या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं नाव कधीच वेगळं होऊ शकलं नाही, आणि त्यांनी त्यांच नावाचं भारतीय संगीत क्षेत्रात अमर करून टाकलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

संगीतविश्वाला ‘या’ सिनेमामुळे मिळाली विशाल- शेखर जोडी, आयपीएलचं अँथम साँग बनवण्यात उचलला मोलाचा वाटा

‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’ म्हणीला फाट्यावर मारणारे साजिद-वाजिद, ज्यांनी सलमानलाही बनवले सुपरस्टार

किशोरदांच्या चित्रपटात रफीसाहेबांना गाणं गायला लावणारी शंकर-जयकिशन संगीतकार जोडी, का पडली नात्यात फूट?

हे देखील वाचा