‘द व्हाइट टायगर’ सामाजिक आणि आर्थिक विषमतेची खोली दर्शवणारा चित्रपट; ‘ही’ भूमिका विशेष गाजली


बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’पासून ते हॉलिवूडच्या ‘क्वांटिको गर्ल’पर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजेच प्रियांका चोप्रा. आपल्या हॉलिवूडच्या चित्रपटाच्या यशानंतर फारच प्रकाशझोतात आली. तिचा चित्रपटाचा प्रवास हा फारच रंजक आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फार चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटामुळे, तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. आता ती तिच्या ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चित्रपटाची कहाणी सुद्धा फारच रंजक आहे. आजकाल बनवले जाणारे सर्व चित्रपट हे  वेगवेगळ्या विषयावर चित्रीत केले जातात. परंतु या चित्रपटाची कथा फार वेगळी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कथेबद्दल जी बनवली गेली आहे एका वेगळ्याच मुद्द्याला अनुसरून…

कोणत्या मुद्द्याला अनुसरून आहे हा चित्रपट
जर तुम्ही गुलामगिरीच्या पिंजऱ्यात असाल, तर तुम्हाला स्वतःचा मालक बनायचे असल्यास तुम्हाला तो पिंजरा तोडावा लागतो. गरीब- श्रीमंत यांच्यातील दरी, जातीचे राजकारण, धर्म, भ्रष्टाचार आणि या सर्वांचा प्रभाव पडत असलेल्या एका सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कथा आहे. मुळात भारतात असलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेची खोली दर्शविणारा हा चित्रपट. समाजातील गरीब व मागासवर्गीय जातीच्या लोकांचा श्रीमंत व उच्चवर्णीय लोक, आपल्या फायद्यासाठी व स्वार्थासाठी कसा फायदा करून घेतात हे दाखवण्याच्या प्रयत्न या चित्रपटातून केला गेला आहे.

जात जमीनदाराचे कुटुंब एका अपघाताच्या घटनेनंतर आपला गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आल्यावर नायक संधी मिळताच आपली चाल खेळतो. कायदा हातात घेत पुढे कसा मोठा व्यावसायिक होतो हा प्रवास यात दिग्दर्शकाने दाखवला आहे. ही कथा नायक भारत भेटीला येत असलेल्या चीनच्या पंतप्रधानांना एका मेलद्वारे सांगत आहे. शिवाय अनेक मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत.

चित्रपटाची कथा
हा चित्रपट लक्ष्मणगढ नावाच्या गावातून दिल्लीला पोहोचणाऱ्या गरीब मुलाची आहे. जो बलराम हलवाई या नावाने प्रचलित आहे. तो अभ्यासात फार हुशार आहे. पण दारिद्र्यामुळे त्याचे शिक्षण लहानपणीच सुटते. त्यानंतर त्याची आजी त्याला कोळसा फोडण्याच्या कामाला लावते. या मुलाच्या वडिलांचा आजाराने मृत्यू होतो. आर्थिक परिस्थितीमुळे हा मुलगा लहान वयातच आपल्या खेडेगावात हॉटेलमध्ये काम करायला लागतो. त्यामुळे त्याला बलराम हलवाई या नावाने ओळखले जाते. परंतु त्याची स्वप्ने फार मोठी असतात. आपल्यावर लादलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या विरोधात जाऊन तटाला मोठं व्हायचं असत, खूप नाव आणि पैसे कमवायचा असतो. त्याला एका जमीनदाराच्या कुटुंबात ड्रायव्हर म्हणून काम मिळते. यात बलराम हलवाई (आदर्श गौरव) हा कथेचा नायक. त्याच्या गावातील धनाढ्य जमीनदार (महेश मांजरेकर). त्याचा अमेरिकेहून परतलेला मुलगा अशोक (राजकुमार राव) व त्याची बायको पिंकी (प्रियांका चोप्रा) यांचा ड्रायव्हर म्हणून काम करायची त्याला संधी मिळते. ज्यात हे कुटुंब एका अपघाताच्या घटनेनंतर आपला गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आल्यावर हा नायक मोक्याची संधी मिळताच आपली चाल खेळतो. त्यात तो कायदा हातात घेत गुन्हा करतो. पुढे तो कसा मोठा व्यावसायिक होतो हा प्रवास दिग्दर्शकाने दाखवला आहे.

प्रमुख पात्र
‘द व्हाइट टायगर’ या सिनेमाने एक सरप्राईज विनर हिंदी सिनेमाला मिळवून दिला आहे तो म्हणजे अभिनेता आदर्श गौरव. आपल्या पहिल्या चित्रपटात या तरुण मुलाने कमालीचा अभिनय केला आहे. सोबतच राजकुमार राव व प्रियांका चोप्रा यांसारखे कलाकार असूनही आदर्शची भूमिका विशेष गाजली आहे. आदर्शला मिळालेली ही सुवर्णसंधी होती त्याचा फायदा त्याला या चित्रपटात झाला. यात महेश मांजरेकर हे वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत.

लेखन दिग्दर्शन
सन २००८ मध्ये अरविंद अडिगा यांची ‘द व्हाइट टाइगर’ ही कादंबरी आली होती. या कादंबरीने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. अनेक आठवडे ही कादंबरी बेस्ट सेलरच्या यादीत वरच्या क्रमांकावर होती. शिवाय या कादंबरीला न्यूयॉर्क टाईम्सची ‘सर्वोत्कृष्ट विक्रेता’ म्हणून स्थान मिळाले होते. या कथेवरून हा चित्रपट करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रहीम बहरानी यांनी केले आहे, तर प्रियांका या चित्रपटाची एक्झिक्यूटिव्ह प्रोड्युसर आहे. मुकुल देवरा या चित्रपटाचे निर्माते आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

-‘द डर्टी पिक्चर’मधील भूमिकेमुळे प्रचंड घाबरली होती ‘विद्या बालन’, स्क्रीनिंगनंतर घडलेले न विसरण्यासारखे

-तब्बल ३० वर्षांनंतर अनुपम खेर यांचे टॉलिवूडमध्ये कमबॅक, बुमराहच्या कथित गर्लफ्रेंडसोबत करणार ‘या’ सिनेमात काम


Leave A Reply

Your email address will not be published.