यामी गौतमच्या लग्नाला एक महिना पूर्ण; अभिनेत्रीने केला पतीसोबतचा नवीन फोटो शेअर


गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने आपल्या आयुष्यात एन्ट्री घेतली आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम झाला. कोरोनाने आपल्याला अनेक हुलकावण्या दिल्या. मात्र, हा विषाणू काही आपल्या जीवनातून गेला नाही. मनोरंजनसृष्टीवर तर या कोरोनाचा मोठा परिणाम झाला. अनेक मोठमोठे सिनेमे प्रदर्शनाभावी रखडले आहेत. मात्र, असे असूनही कलाकार त्यांना मिळालेल्या या सुट्यांचा आनंद लुटताना दिसले, तर काही कलाकारांनी हा मुहूर्त साधत लगीनगाठ बांधली.

कोरोनाकाळ असूनही अनेक कलाकार सर्व नियम, अटी यांचे पालन करत विवाहबंधनात अडकले आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या यामी गौतमनेही नुकतेच लग्न केले आहे. ‘उरी’ फेम दिग्दर्शक आदित्य धरसोबत तिने ही लगीनगाठ बांधली. यामी आणि आदित्यच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने यामीने सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

यामीने तिच्या लग्नाचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेला एक महिना.” ४ जून, २०२१ रोजी यामीने अतिशय खासगी समारंभात आदित्यसोबत लग्न केले. यामीच्या या लग्नाची कुणकुण कोणालाच नव्हती, त्यामुळे सोशल मीडियावर यामीने लग्न झाल्याचे जाहीर करताच तिच्या फॅन्ससाठी हा एक सुखद धक्काच होता.

यामीने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात टेलिव्हिजनवरून केली होती, त्यानंतर तिने ‘विक्की डोनर’ सिनेमातून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. यामीने आतापर्यंत ‘उरी’,’काबिल’,’सनम रे’, ‘गिनी वेड्स सनी’, ‘बदलापूर’ आणि ‘बाला’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, ती लवकरच अभिषेक बच्चनसोबत ‘दसवी’ या सिनेमात दिसणार आहे.

दुसरीकडे आदित्यने ‘काबुल एक्सप्रेस’, ‘तेज’, ‘आक्रोश’ आदी अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने २०१९ साली ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ सिनेमात दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण केले. पाकिस्तानच्या उरी हल्ल्यावर आधारित असलेला हा सिनेमा तुफान गाजला आणि आदित्यला पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कारही देऊन गेला. आदित्य सध्या त्याच्या आगामी ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.