‘कॅटरीनाबरोबर तुलना झाल्यामुळे करियचे वाजले तीन-तेरा’, ‘या’ अभिनेत्रीने केलेत गंभीर आरोप


बॉलिवूडमध्ये नेहमीच दोन अभिनेत्रीची तुलना होतच असते. त्यात जर दोन अभिनेत्रींच्या दिसण्यामध्ये साम्य तर मग विचारायलाच नको. ही तुलना फक्त इंडस्ट्रीमध्येच होते असे नाही, तर प्रेक्षक देखील अशा स्वरूपाच्या तुलना करत त्यांची मते सोशल मीडियावर मांडत असतात. अमृता सिंगसोबत अनेकदा प्रीती झिंटाची तुलना केली गेली, अमिषा पटेलची नीलमसोबत, स्नेहा उल्लालची ऐश्वर्या रायसोबत आदी अनेक उदाहरण आपल्याला देता येतील.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानने आतापर्यंत अनेक मोठ्या आणि उत्कृष्ट अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये संधी दिली. अगदी रवीना टंडनपासून ते सोनाक्षी सिन्हापर्यंत अनेक अभिनेत्रीची नावे यात घेता येतील. यातलेच एक नाव म्हणजे जरीन खान. २०१० साली सलमानने त्याच्या ‘वीर’ सिनेमातून जरीन खानला इंडस्ट्रीमध्ये आणले.

जरीन जेव्हा पहिल्यांदा मीडिया समोर आली तेव्हापासूनच तिची आणि कॅटरिना कैफची तुलना सुरु झाली. जरीन बॉलिवूडमध्ये आली तेव्हा कॅटरीना मोठी आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली होती. त्यावेळी अशी तुलना बऱ्याच अभिनेत्रींनबद्दल होत असल्याने ही गोष्ट खूप सामान्य असल्याचे वाटले. मात्र जसा वेळ गेला तशी ही तुलना वाढतच गेली, आणि जरीनला कॅटरीनाची डुप्लिकेट म्हणूनच ओळख मिळाली.

‘वीर’ चित्रपटानंतर जरीन ‘रेडी’,‘हाऊसफुल’ आणि ‘हेट स्टोरी 3’ सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, अशा हिट चित्रपटांमध्ये काम करूनही जरीन खान चित्रपटसृष्टीतल्या एका गोष्टीमुळे खूप चिडते कारण झरीन खानची तुलना नेहमीच अभिनेत्री कॅटरीना कैफसोबत केली जाते.

जरीनने नुकतेच एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितले. ती म्हणाली, ” मला कधीच माझी तुलना कॅटरीना कैफसोबत केलेली आवडली नाही. कोणत्याही चित्रपट निर्मात्याला माझ्यासोबत काम करण्याची इच्छा नसते. मी कॅटरीनासारखी दिसते आणि एकसारखीच दिसणाऱ्या अभिनेत्रीला निर्माते कास्ट करू इच्छित नाहीत. अगोदर लोकं मला म्हणायचे की, मी माझ्या आईसारखी दिसते मात्र, मी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर मला समजले की मी कॅटरीना कैफसारखी दिसते. गेली ११ वर्षे चित्रपटसृष्टीत मी कॅटरीनासारखी दिसते असे म्हटले जाते. याचा परिणाम माझ्या कारकिर्दीवर झाला आहे.”

पुढे जरीन म्हणाली, ” खरं सांगायचे तर माझा या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा कोणताच प्लॅन नव्हता, मी निव्वळ योगायोगाने या क्षेत्रात आली. इथे आल्यानंतर चांगल्या भूमिका मिळवण्यासाठी माझा खरा संघर्ष सुरु झाला. त्यातही मी ज्या भूमिका केल्या त्यावर नेहमी माझ्याबद्दल नेगेटिव्हच लिहिले गेले. हे खूप मोठे आणि वाईट सर्कल आहे. मला भूमिका मिळाल्याच नाही. इथे आल्यावर माझ्यावर कॅटरिना कैफची डुप्लिकेट असल्याचा ठपका ठेवला गेला, आणि आज इतक्या वर्षांनी देखील तो कायम आहे. माझ्या वजनावरून मला अनेकदा ट्रोल केले गेले. मला ‘फॅटरीना’ नाव देण्यात आले.”

“यासर्व गोष्टीचा माझ्यावर मानसिक खूप मोठा परिणाम झाला. अनेक काळ विचार करून मी शेवटी मला जाणवले की, मला माझे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखायचे. माझी कोण कोणाशी तुलना करते याचा आणि इतर नकारात्मक गोष्टींचा मी माझ्यावर परिणाम होऊ देणार नाही.”

३३ वर्षीय जरीनने आजपर्यंत १० हिंदी, २ पंजाबी, १ तमिळ व १ तेलूगू सिनेमात काम केलं आहे. २०२०मध्ये तिचा हम अकेले, तुम अकेले हा शेवटचा सिनेमा आला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.