Friday, March 29, 2024

आईवडीलांचा ‘इन्कलाब’ आणि लाडाने ‘मुन्ना’, तर या प्रसिद्ध कवीने म्हटले ‘अमिताभ’; वाचा महानायकाच्या नावाचा किस्सा

सिनेसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे कलाकार, ज्यांना आपण सर्वजण ‘बिग बी’, ‘महानायक’, ‘शहेनशाह’ अशा नावांनी ओळखतो, ते म्हणजे अर्थातच अमिताभ हरिवंशराय बच्चन होय. अमिताभ बच्चन हे आज (11 ऑक्टोबर) आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे 1942 साली झाला होता.

आपल्या शानदार अभिनयाने ते करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. पडद्यावर विविध भूमिका साकारणाऱ्या अमिताभ यांच्या आयुष्याची गोष्ट कोणत्याही सुपरहिट चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. तसं पाहिलं तर त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से असे आहेत, जे जाणून घेतल्यावर नक्कीच आश्चर्य वाटते. परंतु एक असाच किस्सा त्यांच्या नावाशी संबंधित आहे, जो चांगलाच रंजक आहे.

अमिताभ या शब्दाचा अर्थ ‘खूप आकर्षक’ असा आहे आणि ते आपल्या नावाप्रमाणेच आहेत. कारण त्यांनी आपल्या अभिनयाने संपूर्ण कलाजगताला गौरविले आहे. तुम्हाला माहिती आहे का, अमिताभ हे नाव त्यांना कोणी दिले होते? नसेल माहिती तर आम्ही आहोतच की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. चला तर मग जाणून घेऊया…

‘अमिताभ’ हे नाव कोणी दिले होते?

अमिताभ बच्चन हे महान कवी आणि लेखक हरिवंश राय बच्चन यांचे पुत्र आहेत. हरिवंश राय बच्चन हे सिनेसृष्टीचे एक मोठे आधारस्तंभ होते. त्यांच्या काळात एक असे कवीदेखील होते, ज्यांना ‘वर्ड्सवर्थ ऑफ इंडिया’ म्हणजेच भारताची शब्द संपत्ती असे म्हटले जात होते. त्या प्रसिद्ध कवीचे नाव होते सुमित्रानंदन पंत. प्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत यांनीच अमिताभ बच्चन यांना ‘अमिताभ’ हे नाव दिले होते.

खरं तर जेव्हा ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला, तेव्हा त्यांची आई लहाणपणी त्यांना ‘मुन्ना’ या नावाने बोलवत असे. त्यानंतर वडील हरिवंश राय बच्चन यांना त्यांचे नाव ‘इन्कलाब’ असे ठेवले होते.

हरिवंशराय बच्चन हे कवी असल्यामुळे त्यांच्या घरी इलाहाबाद येथे नेहमी कवी मंडळींची मैफील जमत असायची. एकवेळी असेच कवी सुमित्रानंदन पंत त्यांच्या घरी आले. त्यांनी अमिताब यांना पाहिले आणि विचारले की, “बेटा, तुझं नाव काय आहे?” त्यावर अमिताभ उत्तरले, “इन्कलाब.” हे नाव ऐकून पंत यांना चांगले वाटले नाही. त्यांनी लगेच म्हटले, “याला अमिताभ नावाने पुकारा.” मग काय त्यादिवसापासून इन्कलाब नावाने ओळखला जाणारा मुलगा अमिताभ या नावाने ओळखला जाऊ लागला. पंत यांना कदाचित माहिती नव्हते की, एक दिवस अमिताभ नक्कीच आपल्या नावाप्रमाणेच बनेल आणि संपूर्ण जग त्यांचे नाव अभिमानाने घेईल.

अमिताभ यांनी १९६९ साली ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. पाच दशकांच्या आपल्या दीर्घ सिनेसृष्टीच्या प्रवासादरम्यान अमिताभ बच्चन यांनी ऍक्शन, कॉमेडी, थ्रिलर, हॉरर आणि अनेक प्रकारच्या शैलीतील चित्रपटांमध्ये काम केले. परंतु बिग बी यांचा अँग्री यंग मॅन वाली भूमिका त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच अनमोल आहे. ‘शोले’ पासून ‘दीवार’ आणि ‘कालिया’पर्यंत अमिताभ बच्चन यांनी अँग्री यंग मॅनची भूमिका आजही डोळ्यासमोर येते. या भूमिकेतील त्यांचे डायलॉग आजही चाहत्यांना तोंडपाठ आहेत. त्यातील ‘शोले’तील एक म्हणजे, “तुम्हारा नाम क्या है बसंती?”

हे देखील वाचा