‘लय बकवास गातो, परत गायलास तर बघच…’, म्हणत प्रसिद्ध गायकाला पोलिसांकडून अटक, ८ तास केली चौकशी

सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, ज्यावर लोक एका रात्रीत स्टार बनतात. त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचते. मात्र, याच स्टार्सना अनेकदा समस्यांचा सामनाही करावा लागतो. त्यांना कोणत्या कारणांमुळे चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल, याचा काही नेम नसतो. असेच काहीसे एका गायकासोबत घडले आहे. सोशल मीडिया स्टार हिरो अलोम याला त्याच्या गाण्याच्या स्टाईलमुळे संकटाचा सामना करावा लागला.

हिरो अलोम (Hero Alom) याला पोलिसांनी अटक केली. तसेच, त्याला तुरुंगात डांबले आणि तब्बल ८ तास चौकशी केली. इतकेच नाही, तर पोलिसांनी त्याला पुन्हा कधीही क्लासिकल (शास्त्रीय) गाणी गायची नाही, असेही खडसावून सांगितले. तसेच, त्याला खराब सिंगरही म्हटले गेले. खुद्द अलोम यानेच माध्यमांना असे सांगितले आहे.

हिरो अलोम याच्याबाबत बोलायचं झालं, तर तो बांगलादेशचा रहिवासी आहे. फेसबुकवर त्याला जवळपास २० लाख लोक फॉलो करतात. दुसरीकडे, त्याच्या युट्यूब चॅनेलवर तब्बल १४ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. स्वत:ला गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणवणारा अलोम याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आपल्या गाण्याच्या स्टाईलमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.

असे असले, तरीही मागील आठवड्यात त्याला त्याच्या गाण्यामुळे संकटांचा सामना करावा लागला. लोकांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांनी अलोमविरुद्ध तक्रारीत म्हटले की, तो शास्त्रीय गाण्यांची छेडछाड करतो. त्याच्यानुसार, मागील आठवड्यात पोलिसांनी त्याचा मानसिक छळ केला. पोलिसांनी त्याला शास्त्रीय गाणी गाणे बंद करण्यास सांगितले. गायक म्हणून तो खूप कुरूप असल्याचेही पोलिसांनी सांगितले. शेवटी, अलोमकडून माफीनाम्यावर सही करून घेतली.

या प्रकरणी ढाक्याचे चीफ डिटेक्टिव्ह हारुन उर रशीद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “अलोमविरुद्ध आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. सध्या अलोमने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याबद्दल आणि त्याच्या व्हिडिओमध्ये परवानगीशिवाय टागोर आणि नजरुलची गाणी गायल्याबद्दल माफी मागितली आहे.”

ते म्हणाले की, “अलोम याने गायनाची पारंपारिक शैली पूर्णपणे बदलली. त्याने आम्हाला आश्वासन दिले आहे की, तो पुन्हा असे काही करणार नाही.”

पोलिसांच्या चौकशीतून सुटका झाल्यानंतर, अलोमने एक नवीन व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये तो तुरुंगाच्या पोशाखात कारागृहाच्या मागे असल्याचे दिसून आले. त्याला फासावर लटकवले जाणार असल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले जात होते.

अलोमसोबतच्या या व्यवहारामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली. अनेकांनी अलोमला समर्थन दर्शवले. या व्यवहाराला वैयक्तिक अधिकारांवर हल्ला असल्याचे लोकांनी म्हटले. एका स्थानिक पत्रकाराने म्हटले की, “मी अलोमच्या गाण्याचा किंवा अभिनयाचा चाहता नाही. मात्र, जर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर मी याच्याविरुद्ध आहे.”

अलोमसोबत घडलेल्या या प्रकरणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रियांचा पूर येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
‘तिने देशाला अनेकवेळा फसवलंय’, पारितोषिक विजेत्या लेखिकेवर भडकले अभिनेते अन्नू कपूर
प्रमोशनसाठी ‘खिलाडी’ अक्षय घरातून पडला बाहेर, पण सेटवर पोहोचताच ढसाढसा लागला रडू; व्हिडिओ व्हायरल
ब्रेकअपच्या बातम्यांमध्येच टायगरच्या व्हिडिओवर दिशाची गजब मागणी; चाहतेही म्हणाले, ‘छोटी बच्ची हो क्या?’

Latest Post