Friday, March 29, 2024

बीएमसी तोडणार अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याची भिंत; यामागे आहे ‘मोठं’ कारण

असं म्हणतात की, मुंबईत स्वतःचे घर होणे म्हणजे स्वप्नवत गोष्ट असते. मात्र, सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांची मुंबईत अनेक घरे असतात. अनेक बंगले, फ्लॅट्स असतात. ही कलाकारांची घरं फॅन्स आणि लोकांमध्ये देखील खूप लोकप्रिय असतात. किंबहुना त्या परिसराची नावे देखील कलाकारांच्या घरांच्या नावावरून ओळखली जातात. असेच एक घर म्हणजे ‘प्रतीक्षा’ बंगला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा हा बंगला म्हणजे मुंबईतील एक पर्यटन स्थळच बनले आहे.

मात्र, आता या प्रतीक्षा बंगल्यासाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच या बंगल्याची काही प्रमाणात तोडफोड
करण्यात येणार आहे. २०१७ साली बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील प्रतीक्षा बंगल्याची एका बाजूची भिंत तोडण्याची तयारी करत आहे. ही भिंत तोडण्यासाठी २०१७ साली अमिताभ यांना एक नोटीस दिली होती. मात्र, या नोटिसीचे उत्तर अमिताभ यांच्याकडून अजून मिळाले नाही. बीएमसीने त्यांच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना प्रतीक्षा बंगला तोडण्याच्या जागांवर चिन्हे टाकण्याचे आदेश दिले आहेत.

संत ज्ञानेश्वर मार्ग मोठा करण्याच्या दृष्टीने या बंगल्याची भिंत तोडण्यात येणार आहे. हा मार्ग प्रतीक्षा बंगल्यावरून एस्कॉन मंदिराकडे जातो. जुहूमध्ये बच्चन परिवाराकडून खरेदी केला गेलेला हा पहिला बंगला आहे. हा बंगला सोडून बच्चन परिवाराचे याच भागात अजून तीन बंगले आहेत. संत ज्ञानेश्वर मार्गाची सध्याची रुंदी ही ४५ फूट इतकी असून बीएमसीला हा मार्ग वाढवून ६० फूट करायचा आहे. जेणेकरून या परिसरात होणाऱ्या ट्रॅफिक जामपासून लोकांना मुक्ती मिळेल.

या रोडच्या रुंदीकरणाच्या कामात दोन बंगले येतात. एक अमिताभ यांचा प्रतीक्षा बंगला, तर दुसरा उद्योगपती केवी सत्यमूर्ती यांचा बंगला. प्रतीक्षापेक्षा सत्यमूर्ती यांच्या बंगल्याचा मोठा भाग या रुंदीकरणामध्ये आला आहे. त्यामुळे सत्यमूर्ती यांनी नोटीस मिळाल्यानंतर ते कोर्टात गेले होते.

कोर्टाने या कामावर स्थगिती आणल्यानंतर बीएमसीने रुंदीकरणाचे काम थांबवले. मागच्यावर्षी बीएमसीच्या प्रयत्नांनी ही स्थगिती हटवली गेली आणि मग सत्यमूर्ती यांचा बंगला तोडण्यात आला होता. पण अजूनपर्यंत अमिताभ यांच्या बंगल्याला हात लावला नव्हता. याचमुळे स्थानिक सभासद असलेले वकील तुलिप ब्रायन मिरांडा यांनी बीएमसी अधिकाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. शिवाय सत्यमूर्ती यांनी देखील बीएमसीवर पक्षपाताचा आरोप केला. यामुळे आता बीएमसीने अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत तोडण्याचे काम सुरू केले आहे. आता या प्रकरणात अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणते पाऊल उचलले जाते, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा