Thursday, March 28, 2024

सावळ्या रंगामुळे जरीना वहाब यांना मिळत नव्हते चित्रपट; देव आनंद यांच्या सिनेमात काम करून पाडली प्रेक्षकांवर छाप

हिंदी सिनेसृष्टीमधे आजपर्यंत आपण अतिशय दिग्गज अशा अभिनेत्रींना पाहिले आहे. ज्यांनी त्यांच्या जिवंत अभिनयाने पठडीबाहेरील भूमिकांना देखील एक वेगळी आणि स्थिर ओळख मिळवून दिली. ज्या काळात स्त्रिया मुख्य भूमिकेसाठी किंवा मुख्य भूमिका मिळण्यासाठी प्रयत्नात होत्या, त्याच काळात काही अभिनेत्रींनी त्यांच्यातला वेगळे कॅरॅक्टर रोल करत दाखवला. अशा अभिनेत्रींनी मुख्य भूमिका देखील तितक्याच दमदार पद्धतीने वठवल्या मात्र तरीही त्यांची पहिली ओळख सहाय्यक तसेच ज्येष्ठ भूमिकाहीच राहिली. आपल्या या इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्यांनी अशा भूमिका केल्या त्यातल्याच एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे जरीना वहाब. जरीना यांना त्यांच्यातला साधेपणा सर्वांपेक्षा नेहमी वेगळा करतो. ८० आणि ९० चे दशक गाजवणाऱ्या जरीना शनिवारी (१७ जुलै) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.

जरीना यांचा जन्म १७ जुलै, १९५९ रोजी आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टम येथे एका मुस्लिम परिवारात झाला. सुरुवातीपासूनच त्यांना अभिनयाबद्दल एक वेगळे प्रेम होते. अभिनयात आणि चित्रपटांमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने त्यांनी पुण्यातल्या फिल्म एँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि चित्रपटांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने त्या मुंबईमध्ये आल्या.

मुंबईत आल्यानंतर त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. इथे त्यांना चित्रपटात काम मिळवण्यासाठी सारखे नकार मिळायचे याचे कारण होते त्यांचा रंग. हो जरीना यांनी या इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीच्या काळात रंगभेदाचा सामना केला आहे. प्रतिभा असूनही केवळ सावळ्या रंगामुळे त्यांना अनेक सिनेमे गमवावे लागले.

मात्र, म्हणतात ना हाताची पाचही बोटं सारखी नसतात, त्यांच्याबाबतही असेच झाले. या क्षेत्रात असे काही लोकं होते, ज्यांना रंगापेक्षा प्रतिभेची अधिक कदर होती. असेच एक दिवस जरीना यांचा ठरला. त्यांना समजले की, देव आनंद हे त्यांच्या आगामी ‘इश्क इश्क इश्क’साठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत, तेव्हा त्या लगेच मेहबूब स्टुडिओमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी ऑडिशन दिले. त्यांची या भूमिकेसाठी निवड झाली आणि त्यांना झीनत अमान यांच्या बहिणीचा रोल मिळाला. त्यांचा हा सिनेमा काही खास चालला नाही, पण जरीना यांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले आणि प्रेक्षकांवर त्यांची छाप सोडण्यात त्या यशस्वी झाल्या.

जरीना यांना खरी ओळख खरी प्रसिद्धी दिली ती राजश्री प्रॉडक्शनच्या ‘चितचोर’ या सिनेमाने. ‘चितचोर’मध्ये जरीना आणि अमोल पालेकर मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा सुपरहिट झाला, आणि प्रेक्षक त्यांच्या अभिनयाचे वेडे झाले. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला. पुढे जरीना आणि अमोल यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या सिनेमानंतर त्यांची अभिनयाची गाडी सुसाट धावली. पुढे त्यांनी ‘घरौंदा’, ‘अनपढ़’, ‘सावन को आने दो’, ‘नैया’, ‘सितारा’, ‘तड़प’, ‘जज्बात’, ‘गोपाल कृष्ण’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

जरीना जेव्हा राज कपूर यांच्याकडे काम मिळवण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांना राज कपूर यांनी नकार दिला आणि सांगितले की, त्या इतर मुलींसारख्या ग्लॅमरस नाहीयेत. खूपच साध्या आहेत. त्यानंतर जरीना यांनी स्वतःवर काम करण्यास सुरुवात केली. ग्लॅमरस अवतारात देखील त्या उत्तम काम करून गेल्या.

‘गुड्डी’ या चित्रपटासाठी ऋषिकेश मुखर्जी अभिनेत्री शोधत होते, तेव्हा जरीना या रांगेत सर्वात पुढे होत्या. मात्र, काहीतरी झाले आणि हा रोल जया बच्चन यांच्या झोळीत पडला, तेव्हा जरीना खूप तुटल्या होत्या. तरीही चिकाटीने आणि मेहनतीने त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्या एक सफल अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

पुढे जरीना यांच्या आयुष्यात एक सुखद वळण आले, जेव्हा त्या ‘कलंक का टीका’ चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. या सिनेमावेळी त्यांची आणि नवीनच असलेल्या आदित्य पांचोली यांची भेट झाली. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि भेटीच्या केवळ २० दिवसांनी जरीना यांनी ६ वर्ष लहान आदित्य पांचोली यांच्याशी १९८६ साली लग्न केले.

लग्नानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले आणि त्या एक गृहिणी झाल्या. पुढे या दोघांना सूरज पांचोली आणि सना पांचोली अशी दोन मुले झाली. या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ- उतार आले. मात्र, जरीना यांनी संयम राखत सर्व संकटांवर यशस्वी मात केली.

जरीना आजही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. त्यांना हिंदी, इंग्लिश उर्दु, तेलुगू आदी भाषांचे उत्तम ज्ञान आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास

-‘गणपती बाप्पा मोरया!’ लग्नानंतर राहुल वैद्यने मंत्रमुग्ध आवाजात केली गणेशाला प्रार्थना; व्हिडिओ होतोय इंटरनेटवर व्हायरल

-तब्बल १२०० किमीचा सायकल प्रवास करत सोनू सूदला भेटायला आला चाहता; त्याचे अनवाणी पाय बघून अभिनेत्याने…

हे देखील वाचा