कौतुकास्पद! विद्या बालनच्या शिरपेचात मानाचा तुरा; तिच्या नावावरून ठेवले काश्मीरमधील लष्कराच्या फायरिंग रेंजचे नाव


मनोरंजनसृष्टीमध्ये नेहमीच कलाकारांमध्ये काही असले नाही तरी चालेल, मात्र सौंदर्य आणि स्लिम फिगर पाहिजेच पाहिजे. या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्यात अभिनयाच्या प्रतिभेपेक्षाही जास्त सौंदर्य आणि योग्य फिगर असल्याने ते या क्षेत्रात यशाच्या शिखरावर आहे. मात्र या सर्वांना काही अपवाद असणारे कलाकार देखील आहे. अशीच एक कलाकार म्हणजे विद्या बालन. अभिनेत्रीची व्याख्या बदलणारी ही ‘उलाला गर्ल’ म्हणजे जिवंत अभिनयच जणू.

आपल्या शरीराचा कधीही न्यूनगंड न बाळगता केवळ प्रतिभेच्या आणि कठोर मेहनतीच्या जोरावर आज विद्या बालन हे नाव एक ब्रँड बनले आहे. आपल्या सशक्त अभिनयाने विद्याने केवळ राष्ट्रीय नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाव रोवले आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या विद्याच्या गौरवात आणखी भर पडली आहे. ऑस्कर समितीची सदस्य झाल्यानंतर आता विद्या बालनच्या नावावरुन फायरिंग रेंजचे नाव देण्यात आले आहे.

भारतीय लष्कराने काश्मीरच्या गुलमर्ग येथे फायरिंग रेंजला विद्या बालनचं नाव दिले आहे. आता ही फायरिंग रेंज ‘विद्या बालन फायरिंग रेंज’ म्हणून ओळखली जाईल. यापूर्वी या रेंजला कोणतेही नाव नव्हते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये विद्या बालनने काश्मीरमधील ‘गुलमर्ग विंटर फेस्टिव्हल’ मध्ये तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर सोबत हजेरी लावली होती.

धाडसी, सामाजिक मुद्द्यांच्या विचारसरणीच्या, स्वतंत्र आणि स्वावलंबी स्त्रियांची प्रतिमा दाखवून पडद्यावर आपली छाप उमटवणार्‍या अभिनेत्रीच्या सन्मानार्थ, भारतीय सैन्याने विद्या बालनच्या नावाने फायरिंग रेंजचे नाव देण्याचे ठरवले. प्रतिभासंपन्न आणि दमदार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्याने तिच्या अभिनयाच्या करियरमध्ये अनेक उपलब्धी मिळवल्या आहेत.

विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर नुकताच तिचा ‘शेरनी’ हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर रिलीझ करण्यात आला आहे. या चित्रपटात विद्याने महिला वन अधिकारीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळात ती ‘तुम्हारी सुलु’ सिनेमाचे दिग्दर्शक असणाऱ्या सुरेश त्रिवेणीसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.