Tuesday, September 26, 2023

“ते सगळ्यांना आशीर्वाद आणि सकारात्मकता द्यायचे” रुपाली भोसलेने सांगितली ‘आई कुठे…’ जयंत सावरकरांसोबतची आठवण

आजचा दिवस संपूर्ण मराठी कलाविश्वासाठी खूपच दुःखद ठरला. मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रतिभावान, जेष्ठ आणि दिग्गज कलाकार जयंत सावरकर यांचे दुःखद निधन झाले आहे. नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या मनोरंजनाच्या सर्वच माध्यमावर काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जयंत सावरकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जयंत (अण्णा) सावरकर यांचे ठाणे याठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री रुपाली भोसलेने देखील आई कुठे काय करते या मालिकेतील अण्णासोबतचा एक सीन शेअर करत त्यांची आठवण सांगितली आहे.

रुपालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन…आण्णा, भावपूर्ण श्रद्धांजली…जेव्हा जेव्हा ते आई कुठे काय करतेच्या शूटला यायचे…तेव्हा तेव्हा ते आम्हा सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि सकारात्मकता द्यायचे. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना नमस्कार केला. त्यांनी खूप आशीर्वाद तर दिलेच, पण त्याचबरोबर माझ्या कामाचं खूप कौतुकही केलं. आपली मालिका आणि काम ते बघतात हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि जबाबदारी वाढली याची जाणीव झाली. अण्णा, आम्हा सगळ्या कलाकारांना तुम्ही खूप काही दिलं, खूप शिकवलंही. तुम्ही शेवटपर्यंत त्याच एनर्जीने काम करत होतात. म्हणून तुमच्यासोबत केलेला हा सीन पोस्ट करतेय”.

जयंत सावरकर यांनी ‘एकच प्याला’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बदफैली’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘कथा नव्या संसाराची’ या नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या.यासोबतच ते ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमध्ये देखील दिसले होते. सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, शिवाय त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. सावरकर ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.

अधिक वाचा –

“आपलं उत्तरदायित्व समजून…” अभिनेता हार्दिक जोशीने मुख्यमंत्रांच्या ‘त्या’ कृतीचे केले भरभरून कौतुक

…बंधनात अडकलो! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा दणक्यात साखरपुडा संपन्न, फोटो झाले व्हायरल

हे देखील वाचा