Wednesday, March 22, 2023

पहिले गाणे मिळवून देण्यासाठी कविता कृष्णमूर्तींना हेमा मालिनींनी केली होती मदत, वाचा त्यांचा सुरमयीप्रवास

हिंदी चित्रपटक्षेत्रात अभिनयाइतकेच संगीत क्षेत्रालाही मोठे महत्व आहे. या गायन क्षेत्रात आजपर्यंत अनेक गायिकांनी आपल्या बहारदार आवाजाच्या जोरावर अधिराज्य गाजवले आहे. यामधीलच एक नाव म्हणजे लोकप्रिय गायिका कविता कृष्णमूर्ती (Kavita Krishnamurti). ९०च्या दशकातील प्रसिद्ध गायिका म्हणून कविता कृष्णमूर्ती यांच्या नावाचा बोलबाला होता. कविता कृष्णमूर्ती यांनी आपल्या सदाबहार आवाजाने अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.

आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी १६ भाषांमध्ये जवळजवळ १८,००० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. तसेच त्यांनी अनेक सुपरहिट गाण्यांसाठी संगीत दिले आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांना पद्यश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी ‘आंख मारे’, ‘डोला रे डोला रे’, ‘ए वतन तेरे लिए’, ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ सारख्या अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांनी फक्त हिंदीमध्येच नव्हे, तर कन्नड, तमिळ, तेलुगू, नेपाळीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. १९९१ मध्ये त्यांनी एल सुब्रमण्यम यांच्याशी विवाह केला होता.

कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म २५ जानेवारी १९५८मध्ये एका तमिळ परिवारात झाला. वयाच्या ८व्या वर्षीच त्यांनी गायन स्पर्धेत बक्षिस मिळवले होते. त्यानंतर त्यांनी गायिका होण्यासाठी तयारी करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे गायक बलराम पूरी यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले. त्याचबरोबर मुंबईच्या जेवियर महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असतानाही त्यांनी अनेक गायन स्पर्धेत सहभाग घेतला होता. इथेच त्यांची भेट मन्ना डे यांच्याशी झाली. त्यांनी कविता यांचा आवाज ऐकुन त्यांना आपल्या जाहिरातीत गाण्याची संधी दिली. मात्र त्यांना चित्रपटांमध्ये गायचं होते आणि यासाठी त्यांना हेमा मालिनींच्या (Hema Malini) आई जया चक्रवर्ती यांनी मदत केली. हेमा मालिनीच्या आई आणि कविताच्या परिवाराचे जुने संबंध होते.

कविता कृष्णमूर्ती यांना चित्रपटक्षेत्रात काम करण्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मोठी मदत केली. हेमा मालिनींनी त्यांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची ओळख करून दिली. प्यारेलाल यांनी आपल्या ‘शरारा’ चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली. महत्वाचे म्हणजे, हे गाणे हेमा मालिनींसाठीच तयार केले गेले होते. याचा खुलासा हेमा मालिनी यांनी ‘इंडियन आयडल’ या शोमध्ये केला होता. कविता कृष्णमूर्ती यांच्या शास्त्रीय संगिताच्या गायनाने प्यारेलाल खूपच प्रभावित झाले होते. त्यांच्या यशामध्ये प्यारेलाल यांचा मोलाचा वाटा आहे.

दरम्यान कविता कृष्णमूर्ती यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. मात्र त्यांनी गायलेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील गाण्यांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहीले नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा