भारीच की! सई ताम्हणकरला या वर्षीच्या आयएमडीबीच्या यादीत मिळाले मानाचे स्थान, अभिनेत्री म्हणाली…


मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (sai tamhankar). ती सतत तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत तिने पात्रं‌ निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे.

सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच‌ तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. अशातच तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सईला आयएमडीबीच्या बेस्ट ऑफ २०२१ च्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे.

इंटरनेट मूव्ही डाटा बेस(आयएमडीबी) ने नुकतीच टॉप १० ब्रेकआउट स्टार्स ऑफ इंडियन फिल्म्स ऍंड वेबसीरिज २०२१ ची लिस्ट जाहीर केली आहे. यात सई ताम्हणकरचा उल्लेख करून तिचा गौरव करण्यात आला आहे. सई ही एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. तिच्या वाट्याला कोणतीही भूमिका येवो ती भूमिका ती चोखपणे बजावत असते. तिने या वर्षी ‘समांतर’ आणि ‘मिमी’ या वेबसीरिज आणि चित्रपटात काम केले आहे. तिच्या याच कार्याची आयएमडीबीने दखल घेतली आणि तिला ब्रेकआउट स्टार असे म्हटले आहे. (Marathi actress Sai Tamhankar got place honor top 10 star IMDB)

या सन्मानाविषयी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणते, ”आयएमडीबी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. कलाकृतीला भाषेचं बंधन न लावता, त्याकडे पाहण्याचा विस्तीर्ण दृष्टिकोण ग्लोबल सिनेमाचा आणि वेबसीरिजचा असतो. अशा ठिकाणी माझ्या कामाचा गौरव होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयएमडीबी सारख्या प्रतिथयश प्लॅटफॉर्मने आपल्या कामाचा असा गौरव करावा ही आनंदाचीच गोष्ट आहे.”

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबत तिने टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत वेगाने भरारी घेतली.

तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.


Latest Post

error: Content is protected !!