×

श्रेयस तळपदेने ‘या’ सिनेमाची घोषणा करत त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रेक्षकांना दिले एक अनोखे गिफ्ट

मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आपल्या नावाचा आणि अभिनयाचा डंका गाजवणाऱ्या श्रेयस तळपदेचा (Shreyas Talapade) आज गुरुवार (२७ जानेवारी) रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ सीरीज, ‘वाह ताज’, ‘इक्बाल’, ‘सावरखेड एक गाव’, ‘पछाडलेला’, ‘बाजी’, ‘सनई चौघडे’ आदी सिनेमांमधून आपल्या प्रभावी अभिनयाची जादू दाखवलेल्या श्रेयसने आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रेक्षकांना एक भन्नाट गिफ्ट दिले आहे.

तसे पाहिले तर वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट दिले जाते मात्र श्रेयसने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रेक्षकांनाच एक अनोखे आणि अविस्मरणीय गिफ्ट दिले आहे. श्रेयस लवकरच मुक्ता बर्वेसोबत एका सिनेमात झळकणार आहे. याची माहिती त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना दिली आहे. बऱ्याच काळानंतर श्रेयस ‘आपडी थापडी’ या मराठी चित्रपटात दिसणार असल्याने प्रेक्षकांना देखील या सिनेमाबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रेयसच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाल्याचे देखील त्याने पोस्टमध्ये सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचा एक टीजर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्याही कलाकाराची झलक दिसली नसली तरी श्रेयस आणि मुक्ता यांचा आवाज मात्र ऐकू येत आहे. टीजरवरून लक्षात येते की, ‘आपडी थापडी’ सिनेमात श्रेयस आणि मुक्ता एका मुलीच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या संवादांवरून हा सिनेमा खेडेगावातील असल्याचे देखील जाणवत आहे. हा टीजर व्हिडिओ शेअर करताना श्रेयस तळपदेने कॅप्शनमध्ये लिहिले, “आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपले प्रेम आणि आशिर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो…हीच बाप्पा चरणी प्रार्थना. #AapdiThaapdi शूटिंग आरंभ!”

श्रेयसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक छोटी मुलगी श्रेयसला म्हणते, “तुमचा हात घ्या.” यावर श्रेयस विचारतो, “काय करत आहेस.” यावर ती म्हणते, “बुमराह जसा बॉल पकडतो तसा हात करा.” यावर श्रेयस म्हणतो, “कसा धरतो बुमऱ्या बॉल?” तेव्हा ती छोटी मुलगी आपल्या बाबांचा हात तिला पाहिजे तसा करते आणि बाबांच्या हाताच्या सहाय्याने भिंतीवर एक कलाकृती तयार करते. रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशात भिंतीवर त्या कलाकृतीची सावली शेळीसारखी दिसते. हे पाहून ते तिघं हसतात.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

अतिशय आकर्षक आणि लक्षवेधी असणारा हा टीजर सर्वानाच आवडत आहे, या सिनेमात श्रेयस आणि मुक्तासोबत संदीप पाठक, नंदू माधव, ख़ुशी हजारे, नवीन आभाळकर अशी अनेक कलाकार मंडळी दिसणार आहे. सध्या श्रेयसची झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका देखील तुफान गाजताना दिसत आहे.

हेही वाचा-

Latest Post