Monday, September 25, 2023

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; दोन आठवड्यात जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ हा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थेटर बाहेर तूफान गर्दी केली आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि  केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा‘ चित्रपटाने प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. तो चित्रपट पाहण्यासाठी विषेश महिला वर्गीची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) चित्रपटानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे. हा चित्रपट चांगलाच गल्ला जमवत आहे.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात  बॉक्सऑफिसवर तब्बल 12.50 कोटींची कमाई केली होती. इतकंच नाही तर प्रदर्शनाच्या दुसऱ्याच रविवारी एका दिवसांत 6.10 कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. तर दुसऱ्या आठवड्यात 24.85 कोटींचा गल्ला जमवत एकूण 37. 35 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच पाहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवडयाची कमाई डबल केली आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी थिएटरमधील गर्दी ओसरलेली दिसत नाही. चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकवर्गाकडून मिळणारी प्रसिद्धी पाहता तिसऱ्या आठवड्यातही आपली हुकमत कायम ठेवत , हा चित्रपट बॉक्सऑफिसवर आपलं नाणं खणखणीत वाजविण्यात यशस्वी झालाय असं म्हणणं नाकारता येत नाही. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि  जिओ स्टुडिओजनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय,उत्कृष्ट कथानक,सुरेल गाणी आणि  दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाचा नाव झळकताना दिसत आहे. (The movie ‘Baipan Bhari Deva’ is a smash hit at the box office)

अधिक वाचा- 
‘चांद्रयान-3’चं प्रक्षेपण कसं झालं दाखवतेय राखी सावंत; व्हिडीओ झाला व्हायरल, म्हणाली, ‘माझ्यामुळे…’
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता गश्मीर महाजनीला पितृशोक! अभिनेता म्हणाला, ‘माझे बाबा…’

हे देखील वाचा