Friday, April 19, 2024

‘या’ 5 दिग्गजांनी 2022मध्ये कायमची एक्झिट घेत चाहत्यांना केले पोरके, यादीत लता दीदींचाही समावेश

जवळपास संपल्यात जमा असलेलं 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी जितकं चांगलं राहिलं, तितकंच वाईटदेखील ठरलं. यादरम्यान अनेक चढ-उतार आले. बॉलिवूडचे अनेक कलाकार आई-वडील बनले, तर काही असे कलाकारही होते, ज्यांना बॉलिवूडने गमावलं. यावर्षी भारतीय संगीतातील दिग्गज गायिका लता दीदी म्हणजेच लता मंगेशकर आणि पंडित बिरजू महाराज यांसारख्या कलाकारांनी जगाचा निरोप घेत पोकळी निर्माण केली. या वर्षाच्या शेवटी आपण बॉलिवूडमधील अशा काही 5 कलाकारांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी 2022मध्ये जगाचा निरोप घेतला.

सन 2022मध्ये जगाचा निरोप घेणारे 5 कलाकार
लता मंगेशकर
‘गाणकोकिळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी याच वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संगीत विश्वाला पोरके केले. त्यांचे निधन 6 फेब्रुवारी, 2022 रोजी झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता दीदींनी 5हून अधिक दशके भारतीय सिनेमांतील गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘अजीब दास्तां है ये’, ‘लग जा गले फिर से’, ‘रंगीला रे’ यांसारख्या गाण्यांचा समावेश होता.

बप्पी लहिरी
जेव्हाही प्रसिद्ध गायकांची चर्चा होईल, तेव्हा बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल. चाहते त्यांना ‘बप्पी दा’ म्हणूनही ओळखतात. बप्पी दा यांची गणना प्रसिद्ध गायक आणि संगीतकारांमध्ये व्हायची. त्यांनी 15 फेब्रुवारी, 2022मध्ये मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर संगीत विश्वातून आणखी एक मोठी पोकळी निर्माण झाली. संगीत विश्वासह त्यांनी राजकारणातही हात आजमावला होता.

राजू श्रीवास्तव
कॉमेडीचे बादशाह आणि प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे जगाचा निरोप घेताना सर्वांना रडवून गेले. जिममध्ये वर्कआऊट करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला आणि अनेक दिवसांपर्यंत त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. शेवटी 21 सप्टेंबर, 2022 रोजी त्यांचे निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. राजू हे सर्वांना हसवायचे, पण त्यांच्या निधनानंतर चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोकही व्यक्त केला होता.

केके
केके (KK) या नावाने प्रसिद्ध असलेला गायक कृष्णकुमार कुन्नत याने त्याच्या आवाजाच्या जादूने लोकांच्या मनात खास जागा निर्माण केली होती. केके त्याच्या शानदार आवाजासाठी ओळखला जायचा. त्याने हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतही गाणी गायली होती. चाहते त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हायचे. त्याचे एका लाईव्ह संगीत कार्यक्रमादरम्यान निधन झाले. तो 53 वर्षांचा होता. कार्यक्रमादरम्यान त्याला अस्वस्थ वाटत होते आणि त्यानंतर त्याचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.

सिद्धू मूसेवाला
गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) हा पंजाबी संगीत विश्वातील प्रसिद्ध नाव होता. तो एक गायकासोबतच संगीतकार, रॅपर, गीतकार आणि अभिनेताही होता. त्याची 29 मे, 2022 रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तो फक्त 28 वर्षांचा होता. त्याच्या हत्येनंतर संगीतविश्वावर शोककळा पसरली होती. (year end 2022 these stars said goodbye to the world in this year)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुणाच्या चालण्यावर कमेंट, तर कुणाला म्हटले ‘गोल्ड डिगर’, पण कलाकारांनीही ट्रोलर्सला शिकवला चांगलाच धडा
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! प्रसिद्ध अभिनेत्री 6 महिन्यांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, ‘दु:खद आहे…’

हे देखील वाचा