आजपर्यंत ज्या अभिनेत्रींनी हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे, त्यामधील अनेक अभिनेत्रींचा पदार्पणाचा काळ खूपच संघर्षमय राहिला आहे. सिनेसृष्टीत इतक्या साऱ्या अभिनेत्री असल्यामुळे त्यांच्या संधीही हुकल्या आहेत. मात्र, तरीही हार न मानता जोमाने उभे होऊन ‘आपणही कमी नाही’ हे काही अभिनेत्रींनी दाखवून दिले आहे. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे, झरीना वहाब होय. झरीना दि. 17 जुलै त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या सिनेप्रवास आणि खास किस्से.
सन 1986 मध्ये थाटला संसार
चर्चा ऐंशीच्या दशकातील अभिनेत्रींची असेल, आणि त्यामध्ये झरीना यांचे नाव येणार नाही, हे जरा पचनी पडत नाही, बरोबर ना. बॉलिवूडवर राज्य करण्याचा विडा उचललेल्या झरीना वहाब (Zarina Wahab) यांचा जन्म १७ जुलै, १९५९ रोजी आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे झाला होता. बॉलिवूडच्या शेकडो सिनेमात काम करणाऱ्या झरीना यांना हिंदीसोबतच इंग्रजी, उर्दू आणि तेलुगू भाषांवरही चांगले ज्ञान आहे. सन १९८६ मध्ये त्यांनी अभिनेते आदित्य पांचोली (Aditya Pancholi) यांच्याशी संसार थाटला होता. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे लग्न मान्य नव्हते. मात्र, त्यांचे आदित्य यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न केले. त्या दोघांनाही सूरज आणि सना ही दोन अपत्य आहेत. विशेष म्हणजे, सूरज हादेखील आईप्रमाणेच अभिनेता आहे.
कसा मिळाला पहिला सिनेमा?
कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच झरीना यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. अनेक दिग्गज अभिनेत्यांप्रमाणे त्यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून (Film And Television Institute Of India) अभिनयाचे धडे गिरवले आहेत. प्रतिभा असूनही त्यांना सिनेमात पहिली संधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. खरं तर, ज्यावेळी झरीना वहाब बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होत्या, त्यावेळी त्यांच्या सावळ्या रंगामुळे त्यांच्या हातातून अनेक सिनेमे निघून जात होते. त्यामुळे त्यांचा संघर्ष अजूनच वाढला होता.
देव आनंद यांनी दिली पदार्पणाची संधी
झरीना वहाब यांनी ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांच्या ‘गुड्डी’ या प्रसिद्ध सिनेमासाठी ऑडिशन दिले होते. ऋषिकेश यांना साधी भोळी दिसणारी मुलगी सिनेमात हवी होती. मात्र, त्यांनी शेवटी झरीना यांना नाही, तर जया भादुरी यांना संधी दिली. मात्र, ऋषिकेश यांचा हा निर्णय जया बच्चन यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला. यामुळे झरीना निराश झाल्या खऱ्या, पण त्यांची प्रयत्नांची पराकाष्टा सुरूच होती. त्यानंतर १९७४ वर्षे उजाडलं. एकेदिवशी अभिनेत्री झरीना यांना समजले की, देव आनंद त्यांच्या ‘इश्क इश्क इश्क’ या नवीन सिनेमासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत आणि झीनत अमान यांच्या बहिणीची भूमिका साकारायची आहे. त्यांना याबाबत समजताच त्या देव आनंद (Dev Anand) यांना भेटायला गेल्या आणि स्क्रीन टेस्टदरम्यान यशस्वीही झाल्या. अशाप्रकारे त्यांना देव आनंद यांनी पदार्पणाची संधी दिली होती.
या सिनेमांमध्येही झळकल्यात झरीना वहाब
झरीना वहाब यांना खरी ओळख मिळाली, ती ‘चितचोर’ या सिनेमातून. राजश्री प्रोडक्शनच्या या सिनेमात झरीना यांच्या अभिनयाला नावाजले गेले होते. या सिनेमाव्यतिरिक्त त्यांनी ‘घरौंदा’, ‘अनपढ़’, ‘सावन को आने दो’, ‘नैया’, ‘सितारा’ आणि ‘तडप’ यांसारख्या शानदार सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
अधिक वाचा-
–“वाट्टेल ते बोलण्याचा परवाना…” रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
–नादखुळा! रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ