Friday, April 19, 2024

शाहरुख खानला मोठा दिलासा, वडोदरा स्टेशन चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रिम कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

पाच वर्षे जुन्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 2017 मध्ये ‘रईस‘ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गुजरातमधील वडोदरा रेल्वे स्थानक येथं चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. याबाबत काँग्रेस नेते जितेंद्र सोळंकी यांनी स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

जितेंद्र सोलंकी यांनी वडोदरा कोर्टात तक्रार दाखल करत सांगितले की, शाहरुख(Shah Rukh Khan)याने चित्रपटाचे नाव असलेला टी-शर्ट आणि इतर प्रमोशन साहित्य जमावाच्या दिशेने फेकले. त्यामुळे हा अपघात झाला. शाहरुखने वडोदरा कोर्टातून बजावलेल्या समन्सला गुजरात हायकोर्टात आव्हान दिले. या वर्षी एप्रिलमध्ये उच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले.

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, अभिनेता अधिकृत परवानगीने त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करत हाेता. चेंगराचेंगरीची अनेक कारणे होती. कोणा एका व्यक्तीला जबाबदार ठेवणं अयाेग्य राहिल. स्टेशनवरील रेल्वे कर्मचारी, पोलिस, अगदी जखमी झालेले व्यक्ती यांनी कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली नाही. ही तक्रार अशा व्यक्तीनं केली जाे वास्व्यात तेथं उपस्थित नव्हता. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जितेंद्र सोलंकी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि सी टी रविकुमार यांनी त्यांचे अपील फेटाळून लावले.

काय होतं संपूर्ण प्रकरण?
शाहरुख खान त्याच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 2017मध्ये मुंबईहून दिल्लीला ट्रेनने गेला होता. वाटेत अनेक ठिकाणावर त्याची ट्रेन थांबली. ज्यामध्ये शाहरुखने चित्रपटाचे प्रमोशन केले. गुजरातमधील वडोदरा येथेही ही ट्रेन थांबली आणि शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी तेथे प्रचंड गर्दी जमली. बघता – बघता माेठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी वाढली. त्यात फरीद खान नावाच्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी अनेक जण जखमीही झाले होते. फरीद एका नातेवाईकाला स्टेशनवर सोडण्यासाठी आला होता, मात्र त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली
स्टेशनवर आलेल्या हजारो चाहत्यांना शाहरुखला पाहायचे होते. जमाव नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. यानंतर चेंगराचेंगरी वाढली आणि फरीद खान त्याच्या कचाट्यात पडला. बेशुद्ध फरीद खानला स्टेशनवरच शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु फरीद खान शुद्धीवर आले नाही. त्यानंतर तातडीने त्याला प्लॅटफॉर्म जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शाहरुखने केले दुःख व्यक्त
प्रमोशनदरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने शाहरुखला खूप दुःख झाले. त्यावेळी शाहरुख म्हणाला, “फरीद खान यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. मी वडोदरात उपस्थित असलेले क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण यांना फरीद खानच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यास सांगितले आहे.”

माध्यमांतील वृत्तांनुसार, सध्या शाहरुख खान ‘अटली’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त शाहरुख खान ‘टायगर 3’मध्ये रॉ ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. मनीश शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काव्या निघाली भलतीच कावेबाज! यामुळे घरच्यांसोबत रचला होता बेपत्ता झाल्याचा कट, नेटकऱ्यांमध्ये संताप
अली-ऋचाच्या लग्नात येणार परदेशी पाहुणे, ‘हे’ दिग्गज हॉलिवूड कलाकार लावणार हजेरी

हे देखील वाचा